धाराशिवचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या नेत्यांच्या संभाव्य पक्षांतरावर सूचक वक्तव्य करून जिल्ह्यातील राजकारणात खळबळ निर्माण केली आहे. "काही जुने मित्र शहरातील कचऱ्याच्या प्रश्नावर उपोषण करत होते. ते जुने मित्र होते आणि भविष्यात नवीन मित्र होतील," असे वक्तव्य करत सरनाईक यांनी पक्ष प्रवेशाच्या चर्चांना बळ दिले.
advertisement
हे वक्तव्य करताना सरनाईक यांच्या सोबत खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे देखील उपस्थित होते. त्यामुळे या वक्तव्याला अधिकच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. नेमके कोण नेते 'नवे मित्र' म्हणून शिंदे गटात प्रवेश करणार, याबाबत चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.
याआधी देखील ‘टायगर ऑपरेशन’ संदर्भात बोलताना प्रताप सरनाईक यांनी धाराशिव जिल्ह्यातील ठाकरे गटातील काही वरिष्ठ नेते शिंदे शिवसेनेकडे येतील, असा दावा केला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे नविन वक्तव्य अधिक सूचक आणि राजकीयदृष्ट्या रणनीतीचा भाग असल्याचे बोलले जात आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतरही अनेक आमदार आणि खासदारांनी शिंदे यांना साथ दिली. तर, आमदार कैलास पाटील हे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणाऱ्या आमदारांसोबत होते. मात्र, नाट्यमयरीत्या कैलास पाटील हे महाराष्ट्राच्या सीमेवरून निसटून मुंबईत आले. कैलास पाटील आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यापूर्वी देखील आपण ठाकरे यांच्यासोबत असून त्यांची साथ सोडणार नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता सरनाईक यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा धुरळा उडाला आहे.