श्री क्षेत्र तुळजापूर येथे आज हैद्राबाद येथून आलेल्या निस्सीम देवीभक्त पद्मप्रिया सतीश गौड यांनी आपल्या कुटुंबासह श्री तुळजाभवानी देवींच्या दर्शनाचा लाभ घेतला, देवीच्या चरणी साडे आठ तोळ्याचा सोन्याचा हार अर्पण केला. गौड कुटुंबीय हे तुळजाभवानी देवीचे भक्त असून दरवर्षी खास दर्शनासाठी तुळजापूरला येत असतात. आजच्या या विशेष भेटीत त्यांनी देवीची ओटी भरली, कुलधर्म कुलाचार पार पाडत देवीची विधिवत पूजा केली आणि सुवर्णहार अर्पण केला. मंदिर संस्थानच्या वतीने गौड कुटुंबीयांचा श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. तुळजाभवानी देवीच्या चरणी केले जाणारे दान हे केवळ भौतिक वस्तू नसून, ते भक्तांच्या अपार श्रद्धेचे आणि देवीवरील निष्ठेचे प्रतीक आहे.
advertisement
दान केलेला हार
दरम्यान, याशिवाय भाविक मंदिरातील दानपेट्यांमध्ये (गुप्त दानपेटी) रोख रक्कम अर्पण करतात. हे दान कोट्यवधी रुपयांच्या स्वरूपात असते. वर्षभरात या रोख दानाची मोजदाद केली जाते आणि त्यातून मंदिराला मोठे उत्पन्न मिळते. भक्त मंदिराच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने देखील दान करू शकतात. अनेक भाविक देवीच्या चरणी सोन्या-चांदीचे दागिने, नाणी आणि इतर वस्तू अर्पण करतात. देवीच्या खजिन्यात शिवकालीन आणि प्राचीन मौल्यवान अलंकार आहेत, जे भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेले आहेत.
यामध्ये सोन्या-चांदीच्या मूर्ती, पादुका, हार, बांगड्या, कर्णफुले आणि इतर आभूषणे यांचा समावेश असतो. काहीवेळा देवीच्या दानपेटीत मौल्यवान हिरे देखील सापडल्याची नोंद आहे. देवीला साडी-चोळी आणि ओटी अर्पण करणे ही एक महत्त्वाची परंपरा आहे. ओटीमध्ये साडी, चोळीचा खण, नारळ, हळद-कुंकू, बांगड्या आणि फळे अर्पण केली जातात. अभिषेक पूजेनंतर देवीला साडी-चोळी अर्पण करण्याची प्रथा आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी, आदिशक्ती श्री तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक महत्त्वाचे आणि पूर्ण शक्तीपीठ मानले जाते. देवीच्या या निवासस्थानाला तुळजापूर (जिल्हा धाराशिव) असे ओळखले जाते. ही देवी भवानी माता, महिषासुरमर्दिनी, तुकाई आणि जगदंबा या नावांनीही ओळखली जाते.