तुळजाभवानी मंदिरात दिवाळीनिमित्त नरक चतुर्दशीला धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे नरकचतुर्दशी निमित्त तुळजाभवानी मातेला सुगंधी उटणे लावून अभ्यंगस्नान करण्यात आले.
सायंकाळी भेंडोळी उत्सव साजरा करण्यात येतो. यानंतर रात्री मंदिरात लक्ष्मीपूजन, खजिनापूजन करण्यात येते. सदरील भेंडोळी उत्सव हा उत्तरेत काशी आणि तीर्थक्षेत्र तुळजापूर येथेच साजरा केला जातो.
advertisement
भेंडोळी म्हणजे एका अकरा फूट लांब व साधारण सात ते आठ इंच जाडीच्या काठीला (दांड) मधोमध कच्च्या केळीचा अखंड घड बांधला जातो. नंतर संपूर्ण दांडावर केळीच्या खोडाचे जे साल गुंडाळतात नंतर चिंचेच्या झाडाच्या छोट्या छोट्या फांद्यांचा एक थर संपूर्ण दांडावर लावला जातो.
यावर आंबड्याच्या झाडाची साल व पीळ घातलेल्या दोरीचा वापर करून सर्व बांधणी झाल्यानंतर एका लोखंडी साखळदंडामध्ये सुती कपड्याचे पलिते तेलामध्ये बुडवून ओवले जातात. भेंडोळीची संपूर्ण बांधणी तयारी व भेंडोळी प्रज्वलन श्री काळभैरव मंदिराच्या समोर केली जाते.
भेंडोळी प्रज्वलनानंतर कालभैरव मंदिरापासून श्रीतुळजाभवाणी देवीच्या मंदिरात आणली जाते. नंतर देवीला पदस्पर्श करून मंदिराला प्रदक्षिणा करून वेशीबाहेर आणून भेंडोळी विझवली जाते.