याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील तरुण निखिल मदनलाल परमेश्वरी हा वडिलांसह दर्शनासाठी तुळजाभवानी मंदिरात आला होता. त्याने व्हीआयपी दर्शनासाठी प्रवेश मागितल्याने त्यास जनसंपर्क कार्यालयाकडून पास आणण्यासाठी पाठवण्यात आले.
जनसंपर्क कार्यालयाकडून ओळखपत्राची विचारणा होताच, त्याने युपीएससीचे बनावट ओळखपत्र दाखवले. या ओळखपत्राविषयी संशय आल्याने जनसंपर्क कार्यालयाने त्यावरील बॅच, वर्ष आणि इतर बाबींची चौकशी केली. तेव्हा निखिल अडखळला. त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीने माफी मागून वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु जनसंपर्क अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलवून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
advertisement
दरम्यान, अंबडचे माजी आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपे यांनी संबंधित तरुणाचा आयएएस म्हणून सत्कार केला आहे. पोलिसांनी खात्री करण्यासाठी टोपे यांच्याशी संपर्क केला असता टोपे यांनी सत्कार केल्याचे मान्य केले आहे. या धक्कादायक प्रकाराने एकच खळबळ उडाली असून तुळजाभवनी मंदिर परिसरातील जनसंपर्क कार्यालयाच्या सतर्कतेमुळे तोतया आयएएस अधिकाऱ्याची चांगलीच भंबेरी उडाली.






