धाराशिव - मागील 50 वर्षांपासून धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरात गुजराती कुटुंब शारदीय नवरात्र महोत्सवा दरम्यान गरब्याची परंपरा जोपासत आहे. लहानग्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण याठिकाणी गरबा खेळतात. उमरगा शहरात अनेक दशकांपासून जोपासल्या जाणाऱ्या या परंपरेचा लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
काय आहे ही परंपरा -
खरेतर गरबा हा शारदीय नवरात्र महोत्सवात सादर होणारा एक पारंपारिक नृत्य प्रकार आहे. भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र महोत्सवाच्या काळात विशेषत्वाने खेळला जातो. महिलांच्या सर्जनशक्तीच्या म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेशी संबंधित हा उत्सव आहे. शारदीय नवरात्रौत्सवात गरबा नृत्यात मध्यभागी घडा ठेवला जातो. या मातीच्या घड्याला छिद्र पाडली जातात आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. या घड्याभोवती महिला व मुली फेर धरतात आणि देवीची स्तुती पर गीते म्हणून पारंपारिक नृत्य करतात.
advertisement
हा घट अथवा कुंभ हा स्रीच्या सर्जनशक्तीचे प्रतीक मानला जातो आणि हीच गरब्याची परंपरा गेली 50 वर्षांपासून उमरगा शहरात आजही पारंपारिक पद्धतीने सुरू आहे. गुजराती कुटुंब अनेक गुजराती प्रांतातील पारंपारिक असलेला हा गरबा आणि त्याची परंपरा जोपासत आहेत.
या कार्यक्रमाची सुरुवात 50 वर्षांपूर्वी झाली असून आजतागायत दरवर्षी हा गरब्याचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षीही मोठ्या संख्येने गुजराती कुटुंबीय या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मोठ्या प्रमाणात उत्साह याठिकाणी गरबा खेळणाऱ्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे.