ॲडव्हान्स पैसे घेऊनही वेळेत ब्लाऊज शिऊन न दिल्याने धाराशिवच्या टेलर महिलेला तब्बल 15 हजार रुपयांचा दंड ग्राहक तक्रार निवारण मंचने ठोठावला आहे. तसेच राहिलेला ब्लाऊज मोफत शिवून देण्याची शिक्षाही सुनावली आहे. स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी जानेवारी 2023 मध्ये शहरातील नेहा संत या टेलरिंगचे दुकान चालवणाऱ्या महिलेकडे वर्कचे दोन ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. यासाठी एकूण 6 हजार 300 रुपये बिलापैकी 3 हजार रुपये ॲडव्हान्स दिले. नेहा संत यांनी वेळेवर ब्लाऊज शिवून दिला नाही.फोन, मेसेजद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही ब्लाऊज मिळत नसल्याने 28 एप्रिल 2023 रोजी कस्तुरे यांनी ॲड.प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली.
advertisement
दरम्यान मंचाने बजावलेल्या नोटिसीला प्रतिसाद न देता नेहा संत या सुनावणीला गैरहजर राहिल्याने 15 जुलै 2024 रोजी ग्राहक मंचाने एकतर्फी आदेश पारित करीत नेहा संत यांना 10 हजार रुपये दंड तसेच तक्रारीचा खर्च म्हणून 5 हजार रुपये स्वाती कस्तुरे यांना देण्याचा आदेश दिला आहे. तसेच मोफत ब्लाउज शिवून देण्यास देखील सांगण्यात आले आहे.