धाराशिव, 7 ऑगस्ट : केंद्र सरकारच्या अमृतभारत स्थानक योजनेअंतर्गत धाराशिव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामाचे मोदींच्या हस्ते ऑनलाईन उद्धघाटन झाले. पण, याच कार्यक्रमाच्या श्रेयवादावरुन आता धाराशिवमध्ये राजकीय नाट्य रंगल्याचे पाहायला मिळते आहे. कारण, कोनशिलेवर पालकमंत्री तानाजी सावंतांचे नावच नसल्याने, शिंदेंच्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे. याचाच फायदा घेत, ठाकरे गटानेही सत्ताधाऱ्यांना लक्ष्य करायला सुरुवात केली आहे.
advertisement
काय आहे प्रकरण?
धाराशिव रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाच्या प्रलंबित मागणीला रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटनाद्वारे मूहूर्त मिळाला. केंद्र सरकारच्या अमृतभारत स्थानक योजनेअंतर्गत झालेला कार्यक्रमात थाटामाटात पार पडला. पण, या कार्यक्रमाच्या ठिकाणी बसवण्यात आलेल्या कोनशिलेवरुन मात्र नवा वाद सुरु झालाय. या कोनशिलेवर पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंतांचं नावच नसल्यानं, शिंदेंची शिवसेना नाराज झालीय.
तानाजी सावंत वगळता जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार व लोकप्रतिनिधींची नावे या कोनशिलेवर लिहिली गेली आहेत. सत्ताधारी पक्षात नावाचं राजकारण पेटलं असतानाच, ठाकरे गटाचे खासदारांनी यावरुन आमदार राणा जगजीतसिंह पाटीलांवर निशाणा साधला. मुद्दा कोनशिलेच्या नावाचा असला, तरी राणा पाटलांनी त्यावर न बोलता ठाकरे गटावर पलटवार करत, राजकारण तापवलं आहे
वाचा - राष्ट्रवादीमध्ये ना वाद, ना फूट! शरद पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात काय?
विकासकामांचं श्रेय घेण्याची चढाओढ राजकीय नेतेमंडळींमध्ये नेहमीच सुरु असते. पण, या चढाओढीत भाजप आमदार राणा पाटलांनी थेट रेल्वे मंत्रालयाच्या कार्यक्रमात भाव खाल्ल्याचं दिसतंय. त्यातूनच पालकमंत्र्याचं नाव कोनशिलेवरुन हटवलं गेल्याची चर्चा आहे. त्यामुळं येत्या काळात याच मुद्द्यावरुन तानाजी सावंत आणि राणा पाटलांमध्ये संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.