धाराशिव : मेहनत करण्याची तयारी असेल आणि जिद्द असेल तर व्यक्ती एक दिवस यशस्वी नक्की होते आणि आपली स्वप्न नक्की पूर्ण करतो. हे एका व्यक्तीने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. आज अशाच दोन भावांची कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
दीपक बिराजदार व दिनेश बिराजदार अशी या दोन भावांची नावे आहेत. ते धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरातील रहिवासी आहेत. या दोघा बंधूंनी पाच वर्षांपूर्वी वडिलांच्या इलेक्ट्रॉनिकच्या व्यवसायात 20 हजार रुपयांची गुंतवणूक केली. आज त्यांचा या व्यवसायाची भरभराट होत आहे.
advertisement
सुरुवातीला त्यांना व्यवसायात अनेक अडचणी आल्या. मग त्यावेळेस दीपकने या अडचणींवर मात करण्यासाठी पुणे येथे जाऊन इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान शिकून घेतले आणि व्यवसायातील बारकावे समजून घेतले. यानतंर अवघ्या काही दिवसात गावी परतल्यानंतर व्यवसाय वाढीवर भर दिला.
या दोनही बंधूंनी वडिलांच्या इलेक्ट्रॉनिक व्यवसायाला नवसंजीवनी दिली. तसेच व्यवसाय मोठा केला. आज महिन्याला त्यांच्या या व्यवसायातून 1 ते दीड लाख रुपयांची उलाढाल होत आहे. अवघ्या 28 वर्ष वयाच्या दीपक बिराजदार आणि 25 वर्ष वयाच्या दिनेश बिराजदार या दोघांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. परंतु नोकरीच्या मागे न लागता त्यांनी व्यवसायातून स्वतःची ओळख निर्माण केली आणि वडिलांनी सुपूर्द केलेला व्यवसाय भरभराटीला आणला.
मागील महिनाभरात त्यांनी जिद्दीच्या आणि संघर्षाच्या जोरावर आणखी एका इलेक्ट्रॉनिक दालनाचे उद्घाटनही केले आहे त्यामुळे त्यांची आता दुसरी शाखा देखील कार्यान्वित झाली आहे. त्यांची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.