मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील गुरुद्वारामध्ये ही घटना घडली. गुरुद्वाराचे प्रमुख असलेले बाबा धीरजसिंग हे गुरुद्वारामध्ये बसून वर्तमानपत्र वाचत होते. त्याच वेळी, उमेश नावाच्या सेवेकऱ्याने अचानक त्यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. हा हल्ला इतका अचानक आणि भीषण होता की, बाबा धीरजसिंग यांना सावरण्याची संधी मिळाली नाही.
या प्राणघातक हल्ल्यात बाबा धीरजसिंग हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच, त्यांना वाचवण्यासाठी धावलेले बाबा रणवीरसिंग हे देखील जखमी झाले. अशाप्रकारे रक्तपात घडल्याने गुरुद्वारामध्ये एकच गोंधळ उडाला.
advertisement
गंभीर जखमी झालेल्या बाबा धीरजसिंग यांना तातडीने उपचारासाठी शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर उपचार करत आहेत. हा हल्ला करणाऱ्या सेवेकऱ्याचे नाव उमेश असल्याचे समोर आले आहे. मात्र, उमेशने हा हल्ला नेमका कोणत्या कारणामुळे केला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. यामागे वैयक्तिक वाद आहे की अन्य कोणते कारण, याबद्दल पोलीस तपास करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांनी जखमींची विचारपूस केली असून, घटनास्थळाची पाहणी केली आहे. पोलिसांनी उमेशला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे धुळे शहरात आणि शीख समाजामध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
