एकाच झाडाला घेतला गळफास
मिळालेल्या माहितीनुसार, सटीपाणी येथील शेतकरी पप्पू मांगीलाल पावरा (२३) आणि त्याची दुसरी पत्नी लक्ष्मी (१९) या दोघांचे मृतदेह शेतातील लिंबाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. शनिवारी रात्री पिकांना पाणी देण्याचे कारण सांगून पप्पू घराबाहेर पडला होता, मात्र तो रात्रभर परतला नाही. सकाळी पत्नी लक्ष्मीदेखील घरात नसल्याचे लक्षात आल्यावर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. यानंतर शेतात दोघांनीही एकाच दोरीने गळफास घेतल्याचं समोर आलं.
advertisement
दुसऱ्या लग्नानंतर ८ व्या दिवशी टोकाचं पाऊल
पप्पू पावरा हा आधीच विवाहित होता आणि त्याला पहिल्या पत्नीपासून दोन लहान मुलं आहेत. त्याने गावातीलच लक्ष्मीसोबत दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीला या विवाहास कुटुंबीयांकडून काहीसा विरोध झाला. मात्र नंतर दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने ८ दिवसांपूर्वीच त्यांचा विवाह पार पडला. संसार सुखाचा सुरू असतानाच दोघांनी हे टोकाचे पाऊल का उचललं? हे अद्याप स्पष्ट झालं नाही.
या घटनेची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपसिंग पावरा, राजू पावरा आणि सुकलाल पावरा यांच्या मदतीने मृतदेह खाली उतरवून रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी आणि उपनिरीक्षक संदीप दरवडे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
