मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी भाजपमध्ये तीव्र अंतर्गत अस्वस्थता उफाळून आली आहे. छत्रपती संभाजीनगरनंतर आता नाशिकमध्येही उमेदवारी आणि एबी फॉर्मच्या वाटपावरून अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. उमेदवारी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत असंख्य कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून, या प्रकारामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष उघडपणे समोर आला आहे.
advertisement
नाशिक शहरात भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांच्याकडे एबी फॉर्म असल्याची चर्चा पसरताच इच्छुक उमेदवार आणि संतप्त कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाहनाचा पाठलाग केल्याची घटना घडली. या वाहनात आमदार राहुल ढिकले आणि सीमा हीरे उपस्थित असल्याची माहिती समोर आली आहे. एबी फॉर्म कोणाला मिळणार, यावरून कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि तणाव निर्माण झाला होता. काही वेळातच हा तणाव रस्त्यावरच्या गोंधळात परिवर्तित झाला. पक्षाशी अनेक वर्षांपासून निष्ठेने जोडलेले कार्यकर्ते डावलले जात असून, नव्याने आलेल्या किंवा बाहेरून पक्षात प्रवेश केलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे.
“आम्ही पक्षासाठी घाम गाळला, आंदोलनं केली, निवडणुकांमध्ये पक्षासाठी जीवाचे रान केले. पण आज संधी मात्र इतरांनाच दिली जाते,” अशी भावना अनेक इच्छुक उमेदवारांनी व्यक्त केली. त्यामुळे नाशिकमध्ये काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनीही सतर्कता बाळगली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनांनी भाजप नेतृत्वाची चिंता आणखी वाढवली आहे. तेथे भाजप कार्यालयात उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेले कार्यकर्ते आणि पदाधिकारी थेट राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात दाखल झाले. जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की आणि गोंधळामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. काही वेळ परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला.
या गोंधळादरम्यान एका इच्छुक महिला उमेदवाराने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली. दिव्या मराठे असे या तरुणीचे नाव असून, पक्षाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत तिने टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने वेळेत हस्तक्षेप झाल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे भाजपमधील नाराजी किती तीव्र स्वरूपाची आहे, हे अधोरेखित झाले.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत काही तासांवर येऊन ठेपली असताना, संभाव्य बंडखोरीच्या भीतीने भाजपसह अनेक पक्षांनी उमेदवारांची अधिकृत यादी उशिरापर्यंत जाहीर केली नव्हती. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिंदे गटाची युती तुटल्यानंतर एबी फॉर्मचे वाटप सुरू झाले आणि त्यातूनच असंतोषाचा स्फोट झाला आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे भाजप नेतृत्वापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढणे, बंडखोरी रोखणे आणि निवडणुकीत संघटनात्मक ताकद टिकवून ठेवणे, हे पक्षासाठी अवघड बनले आहे.
