काही दिवसांपूर्वी दिशाचे वडील सतीश सालियान यांनी हायकोर्टात रिट याचिका दाखल केली होती. दिशाच्या मृत्यूचा तपास पुन्हा एकदा सीबीआयकडून व्हावा, यात आदित्य ठाकरे यांचं काय कनेक्शन आहे? याचाही तपास व्हावा, अशी मागणी दिशाच्या वडिलांनी केली होती. पण आता मालवणी पोलिसांनी दिशाच्या वडिलांच्या आरोपांचं खंडण करणारं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केलं आहे.
advertisement
दिशाची हत्या झाल्याचा किंवा त्यामागे आदित्य ठाकरे यांचा हात असल्याच्या याचिकाकर्त्यांच्या आरोपांचे कोणतेही पुरावे नाहीत, असेही पोलिसांनी म्हटले आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या झाल्याचा दावा करीत या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी तिचे वडील सतीश सालियन यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. न्या. अजय गडकरी आणि न्या. आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली.
मालवणी पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात काय म्हटलं?
मालवणी पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सतीश यांनी केलेल्या दाव्यांचे खंडन केले. घटनेवेळी उपस्थित दिशाचा प्रियकर आणि मित्रांनी दिलेल्या जबाबात सातत्य असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. सतीश आणि दिशाच्या आईचे अनेकदा जबाब नोंदवले होते; परंतु त्यांनी एकदाही याचिकेतील आरोप केला नव्हता, असा दावाही पोलिसांनी केला. दुसरीकडे याचिकेतील आरोपांवर मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर दाखल करण्याचे आदेश सुनावणीवेळी दिले असताना, वरिष्ठ पोलिस निरीक्षकाने या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केल्याकडे सतीश यांचे वकील नीलेश ओझा यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
आदित्य ठाकरेंची भूमिका
दरम्यान, दिशा सालियन मृत्यूप्रकरणी निर्णय देण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी हस्तक्षेप याचिकेद्वारे उच्च न्यायालयात बुधवारी केली होती. या प्रकरणात आपलं नाव राजकीय सूडबुद्धीने गोवण्यात आल्याचा दावाही ठाकरे यांनी याचिकेत केला होता. यानंतर आदित्य ठाकरेंना अंशत: कोर्टाकडून दिलासा मिळाल्याचं सांगितलं जातंय.