काही दिवसांपूर्वी यशवंत माने यांनी अनगर येथील रहिवासी असणाऱ्या उज्ज्वला थिटे नावाच्या महिलेचा उल्लेख करत, राजू खरे आणि उमेश पाटील यांनी विधानसभेच्या काळात या महिलेला ५० लाख रुपये दिले असा दावा केला. तसेच संबंधित महिला पुण्यात माझ्या ऑफिसवर आली. दहा लाखाची आणि इनोव्हा कारची मागणी केली, असा आरोपही यशवंत माने यांनी केला होता. यशवंत मानेंच्या या आरोपांना आता राजू खरे यांनी उत्तर दिलं आहे.
advertisement
उज्ज्वला थिटे या अनगर येथील पाटलांच्या सुनबाई आहेत. त्यांची अगनगरमध्ये जवळपास 30 ते 35 एकर जमीन होती. पण त्यांच्यावर अनगरमध्ये प्रचंड अन्याय झाला. मी पण दोन पोरींचा बाप आहे. एका महिलेला अनगर सोडून जाण्याची वेळ आली. ती महिला तक्रार घेऊन यशवंत मानेंकडे गेली. पण त्यांनी त्या महिलेला न्याय न देता त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले, अशी प्रतिक्रिया राजू खरे यांनी दिली. तसेच यशवंत मानेला जरा लाज वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया राजू खरे यांचे समर्थक उमेश पाटील यांनी केली. आता या महिलेवरून मोहोळचं राजकारण तापताना दिसत आहे.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, उज्ज्वला थिटे या मूळच्या अनगरच्या रहिवासी आहेत. त्या अनगरचे वजनदार नेते राजन पाटील यांच्या राजकीय विरोधक आहेत. मागच्या काही काळात राजन पाटील यांनी आपल्यावर सूड बुद्धीने राजकारण केलं. घरावर दरोडा टाकला, अशा प्रकारे आरोप उज्ज्वला थिटे यांनी केले होते. याबाबत न्याय मागण्यासाठी थिटे यांनी आंदोलनही केलं होतं.
दरम्यान, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत उज्ज्वला थिटे या राजू खरे यांच्या प्रसारसभांमध्ये दिसून आल्या. यावरून यशवंत माने यांनी त्यांच्यावर ५० लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. शिवाय थिटे या आपल्या पुण्यातील ऑफिसमध्ये आल्या. त्यांनी दहा रुपये आणि एक इनोव्हा कारची मागणी केली, असा आरोप यशवंत मानेंनी केला होता. याच आरोपांना राजू खरे यांनी आता चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
