'देव आला द्यायला आणि पदर नाही घ्यायला' अशी आपल्याकडे एक म्हण आहे. ही म्हण चंद्रपूरमधल्या काँग्रेसबद्दल तंतोतंत लागू पडत आहेत. जनतेनं सगळ्यात मोठा पक्ष म्हणून त्यांना निवडून दिलं. पण सत्तास्थापनेच्यावेळी त्यांच्या दोन बड्या नेत्यांमधली दुफळी सत्ता गमावण्याचं कारण ठरू शकते.
चंद्रपूर पालिकेत काँग्रेसच्या निवडून आलेल्या नगरसेवकांना दोन गटात वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे. एक गट खासदार प्रतिभा धानोरकरांसोबत आहेत तर दुसरा गट आमदार विजय वडेट्टीवारांनी सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे. आता हे असं का झालं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यामागचं कारण आहे काँग्रेसमधील गटबाजी. धानोरकर आणि वडेट्टीवार हे दोघेही काँग्रेसमध्ये असले तरी त्यांच्यातील गटबाजी काही लपून राहिली नाही. चंद्रपूर पालिका निवडणुकीच्या निमित्तानं ती पुन्हा चव्हाट्यावर आली आहे.
advertisement
"काँग्रेसचा एक गट केवळ एक अफवा आहे. संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. नगरसेवक सुरक्षित आहे. सर्व आमच्याकडे आहेत ते खासदारांकडे असो की, आमदारांकडे असू दे आम्ही काँग्रेसचे आहोत' असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे.
पण, निवडू आलेल्या काँग्रेसच्या 27 नगरसेवकांपैकी 12 जण हे खासदार प्रतिभा धानोरकर यांना मानणारे आहेत तर 15 नगरसेवक हे वडेट्टीवार समर्थक आहेत. भलेही नगरसेवक फुटू नये म्हणून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं असलं तर त्यांच्यातील गटबाजी लपून राहिली नाही.
चंद्रपुरात किती बलाबल, काय आहे गणित?
चंद्रपूर मनपात एकूण 66 जागा आहेत. सत्ता स्थापनेसाठी 34 या बहुमताच्या आकड्याची गरज आहे. सद्यस्थितीत कोणाकडेही स्पष्ट बहुमत नाही. चंद्रपुरात काँग्रेसचे सर्वाधिक 27 नगरसेवक आहे. काँग्रेस आघाडीत काँग्रेस - 27 काँग्रेस समर्थित जनविकास सेना 3 असे एकूण 30 नगरसेवकांचं संख्याबळ काँग्रेस आघाडीकडे आहे. बहुमतासाठी काँग्रेस आघाडीला 4 नगरसेवकांची आवश्यकता आहे
पण धानोरकर आणि वडेट्टीवारांमधील गटबाजीमुळे हातातोंडाशी आलेली सत्ता हिरावून जाण्याची शक्यता आहे. कारण भाजपनं काँग्रेसच्या नगरसेवकांसाठी गळ टाकला आहे.
"काँग्रेसचे काही नगरसेवकांशी आमचं बोलणं झालं आहे, विकासासाठी तुम्ही आमच्या बाजूनं यावं. काँग्रेसचे नगरसेवक तसा प्रतिसादही देत आहेत. भाजपच्या काही नगरसेवकांना काँग्रेसच्या नगरसेवकांशी संपर्क करण्याची जबाबदारी दिली आहे, असं भाजपचे नेते मुनगंटीवार यांनी सांगितलं.
भाजपकडेही बहुमत नाही
दरम्यान काँग्रेसनं आता ठाकरेंच्या शिवसेनेशी बोलणी सुरt केली आहे. चंद्रपूर पालिकेत शिवसेना उबाठाचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. चंद्रपुरात भाजप 23 तर शिंदेंच्या शिवसेनेचा 1 नगरसेवक निवडून आला आहे. भाजप-शिवसेना युतीला बहुमतासाठी 10 नगरसेवकाची आवश्यकता आहे.
आता काँग्रेस ठाकरेंच्या सेनेला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार की, भाजप बाजी मारणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. धानोरकर -वडेट्टीवारांमधील गटबाजी भाजपच्या पथ्यावर तर पडणार नाही ना? अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
