राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रांजल खेवलकर प्रकरणावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. खेवलकर यांचा तपास पोलिसांऐवजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर करत असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी लगावला आहे.
खडसे यांनी पुढे म्हटले की, “रूपालीताई आणि रोहिणीताई यांचे जुने संबंध सर्वांना माहिती आहेत. त्यांनी सत्य बोलावं, पण मी जावयाचं समर्थन करणारा नाही. मात्र, ही चौकशी एसआयटीने कशी करावी? ही चौकशी सीबीआयने करावी. तसेच पोलिसांनी स्पष्ट करावं की तक्रार ही संबंधित महिलेकडून आहे की इतर कुणाकडून आहे, असे खडसे यांनी म्हटले.
advertisement
खडसे यांनी पुढे म्हटले की, “प्रांजल खेवलकर यांचे वैयक्तिक जीवन आहे. यावर बेछूटपणे बोलण्याचा अधिकार कुणालाही नाही. काही सांगायचं असेल तर रितसर तक्रार द्या. माझा जावई असो किंवा इतर कुणी, दोषी आढळल्यास शिक्षा झालीच पाहिजे. पण बदनामी करण्याचे काम विरोधकांनी करू नये, असेही खडसे यांनी स्पष्ट केले.
मोबाईलमधील कथित अश्लील फोटो-व्हिडीओबाबत बोलताना खडसे म्हणाले, “अशा गोष्टींची खात्री पोलीसांनी द्यावी, रूपाली चाकणकरांनी नव्हे. त्यांना हे कसं माहित पडलं? गुन्हा दाखल झाल्याशिवाय कुणालाही यावर बोलण्याचा अधिकार नाही.”
एकनाथ खडसेंनी रुपाली चाकणकरांना टोला लगावताना म्हटले की, 'रूपालीताईंनी प्रफुल्ल लोढा आणि नाशिकच्या प्रकरणांकडे लक्ष द्यावे. तसेच महाराष्ट्रात जिथे महिलांवर अत्याचार होत आहेत, तिथे लक्ष केंद्रीत करून सर्व बाजूंनी चौकशी व्हावी, असे खडसे यांनी म्हटले.
