समोर आलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील मातोश्री परिसरात एक अज्ञात ड्रोन घिरट्या घालताना आढळला. या परिसरात कोणत्याही प्रकारचे ड्रोन किंवा हवाई साधन उडवण्यास कायद्याने बंदी आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने ड्रोन उडवण्यास मनाई आहे. अशातच आता मातोश्रीवर ड्रोनने नजर ठेवल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरेंच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘मातोश्री’ हा उच्च सुरक्षा झोन असल्याने हा प्रकार गांभीर्याने घेतला जात आहे. पोलिसांनादेखील याबाबत कळवण्यात आले आहे.
advertisement
मुंबई पोलिसांनी काय सांगितले?
मातोश्री निवासस्थान परिसरात ड्रोनच्या घिरट्या दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले. मुंबई पोलिसांनी याबाबतची माहिती दिली असून हे ड्रोन एमएमआरडीएचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी एमएमआरडीएने परवानगी घेतली होती. खेरवाडी, वांद्रे-कुर्ला संकुलातील परिसरातील सर्वेक्षणासाठी हे ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दोन ड्रोन यासाठी उडवण्यात आले होते.
