पालघर: गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण कोकणात तुफान न थांबणारा पाऊस कोसळत आहे. पालघर, ठाणे, मुंबई पट्ट्याला तर पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. त्यातच पावसाळा म्हटलं की वीज पुरवठा खंडीत होणं अगदी ठरलेलंच. अशीच डहाणू, पालघर परिसरातील जनता गेल्या दोन दिवसांपासून अंधारात आहे.
पालघरच्या डहाणूसह परिसराला मुसळधार पावसाने झोडपलं . डहाणूच्या पूर्व भागातील बत्ती 48 तासांपासून गुल आहे. चारोटी , कासा , उर्से परिसरातील विज पुरवठा मागील 48 तासापासून खंडीत असल्याचं निदर्शनास आलं आहे. अनेक ठिकाणी विद्युत वाहिन्या तुटून पडल्याने डहाणूच्या पूर्व ग्रामीण भागातील नागरिक दोन दिवसांपासून अंधारात आहेत. लोकांचं दैनंदिन जीवनमान पुरत खोळंबलं आहे. शिक्षण घेणाऱ्या मुलांना, नागरिकांना प्रचंड मनस्तापाला समोर जावं लागत आहे. तात्काळ या समस्येवर उपाय शोधावा अशी मागणी केली जात आहे.
advertisement
मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबईमध्ये जोरदार पावसाचा इशारा
राज्याच्या विविध भागात पाऊस कोसळत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता पुन्हा राज्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने नेमकं काय म्हटलं, हे आपण जाणून घेऊयात.
मुंबईतील काही भागात पाऊस सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई याठिकाणी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील 4 दिवस या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या मुंबईत कमाल 30°C तर किमान 21°C तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना अतिपावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात देखील कालपासून मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. पुण्यात उद्या कमाल 32°C तर किमान 23°C तापमान असेल. सातारा जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा कहर पहायला मिळत आहे. या पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
