छ. संभाजीनगर : महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३० डिसेंबर रोजी संपल्यानंतर भारतीय जनता पक्षात तीव्र असंतोष उफाळून आला आहे. एबी फॉर्म न मिळाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांची उमेदवारी बाद झाली असून, यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. पक्षाच्या निर्णयाविरोधात सलग दुसऱ्या दिवशीही संतप्त कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतली.
advertisement
आज माजी मंत्री भागवत कराड आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्या वाहनांना घेराव घालत नाराज कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “पक्षाने आमच्याशी अन्याय केला आहे,” असा आरोप करत कार्यकर्त्यांनी थेट नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली. काही ठिकाणी परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.
नाराज इच्छुक उमेदवारांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत म्हटले की, “आम्हाला डावलले गेले तर आम्ही नेत्यांना प्रचारासाठी प्रभागात येऊ देणार नाही. गरज पडल्यास मतदानावरही बहिष्कार टाकू.” अनेकांनी आरोप केला की, वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या जवळच्या व्यक्ती, पीए आणि बाहेरून आलेल्या लोकांना उमेदवारी देण्यात आली. “आम्ही १५ ते २० वर्षे पक्षासाठी रस्त्यावर काम केले, पण शेवटी आमच्याच पाठीवर वार झाला,” असा संताप व्यक्त करण्यात आला.
नाराज कार्यकर्त्यांचा आरोप आहे की, उमेदवारी संदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता अनेक नेत्यांचे फोन बंद होते. “मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेते जनतेवर आणि कार्यकर्त्यांवर अन्याय करू नयेत,” अशी भावनिक मागणी यावेळी करण्यात आली. “आमचे उमेदवार पुन्हा उभे राहिले तरच आम्ही मतदानाचा विचार करू,” असेही काही इच्छुकांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, गेल्या २४ तासांत ही दुसरी मोठी गडबड असल्याने भाजप नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. कालही शहरातील भाजप कार्यालयात उमेदवारी नाकारल्याने नाराज कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जोरदार राडा घातला होता. मंत्री अतुल सावे यांच्या कार्यालयात थेट धडक देत संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला होता.
