राज्याच्या पोलीस विभागाच्या एका महत्वाच्या अधिकृत कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेही उपस्थित होते. मात्र कार्यक्रमाच्या पत्रिकेत नाव असूनही शिंदे गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले आहे.
कार्यक्रम सरकारी स्वरूपाचा आणि उच्चस्तरीय मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणारा असल्याने तिन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसतील, अशी अपेक्षा होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक उपस्थित राहिले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमागचं नेमकं कारण अजूनही उघड झालेलं नाही. शिंदे गटाकडून किंवा सरकारकडून अधिकृत प्रतिक्रिया न आल्यामुळे विविध अंदाजांना उधाण आले आहे.
advertisement
विशेष म्हणजे कार्यक्रम पत्रिकेत एकनाथ शिंदे यांचं नाव स्पष्टपणे छापलेलं होतं, ज्यावरून त्यांची उपस्थिती अपेक्षित असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे अचानक केलेल्या गैरहजेरीमागे राजकीय नाराजी? आरोग्य कारणे? की दुसरा काही अत्यावश्यक दौरा? याबाबत चर्चा रंगत आहे.
सत्तेत असलेल्या तिन्ही प्रमुख नेत्यांपैकी एक नेता अशा महत्वाच्या कार्यक्रमाला गैरहजर राहिल्याने आगामी राजकीय समीकरणांवरही या घटनेचा परिणाम दिसून येईल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कॅबिनेटवर शिंदेंच्या मंत्र्यांचा बहिष्कार...
मंगळवारी, मंत्रिमंडळ बैठकीवर शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातल्याचे समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर लगेचच शिवसेना मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत नाराजी मांडली. डोंबिवलीतील अलीकडील पक्षप्रवेशामुळे पक्षात निर्माण झालेल्या असंतोषाची जाणीव त्यांनी मुख्यमंत्र्यांना करून दिली.डोंबिवली भाजप प्रवेशामुळे शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वात मोठा असंतोष उसळला असून याचे पडसाद थेट कॅबिनेट बैठकीपर्यंत पोहोचले.
