ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली. सरकार स्थापन होऊन तब्बल आठ महिने झाले तरीही ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नव्हती. अखेर शुक्रवारी चर्चित बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
वाहतूक कोंडीवरुन शिंदे संतापले
पनवेल ते कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघरच्या वाहतूक कोंडीवरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संताप व्यक्त केला. ठाणे ते भिवंडी वडपा येथील रस्ता का झाला नाही? तो रस्ता काय मुंबई कोकण सारखा ऐतिहासिक रस्ता आहे का? रस्ता होत आहे की नाही हे बघायचे काम कुणाचे आहे? हा रस्ता माझ्या खात्यात येतोय, माझे नाव खराब होते आहे. अधिकाऱ्यांना कामे करायची नसतील तर मी थेट निलंबित करेन, असा धमकीवजा इशारा एकनाथ शिंदे यांनी दिला.
advertisement
रस्ते, वाहतूक कोंडीवरून लोक त्रस्त आहेत. अनेक वेळा अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे लोकप्रतिनिधींना रोषाला सामोरे जावे लागते. अधिकाऱ्यांनी वेगाने कामे करावीत. जर अधिकारी संथपणे काम करीत असतील, त्यांच्या कामात हलगर्जीपणा करीत असतील तर मी त्यांना निलंबित करेन, असे शिंदे म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांनी कंत्राटदारांचे कान उपटले
तर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी रस्त्याचे काम करणारा ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर संताप व्यक्त केला. १० वर्ष जुन्या टेक्नोलॉजीने काम सुरू आहे, असे म्हणत त्यांनी कंत्राटदारांचे कान उपटले.
जबाबदाऱ्यांची टोलवाटोलवी
तर, नियोजन समिती बैठकीत ठाणे वाहतूक पोलिस विभागाचे पोलिस उपायुक्त पंकज शिरसाठ यांनी देखील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) विभागातील अधिकाऱ्यांवर वाहतूक कोंडीचे खापर फोडले. समुद्री महामार्ग झाला पण ठाणे ते भिवंडी वडपा रस्ता झाला नाही. सहा लेनवरुन थेट दोन लेनवर बॉटल नेक होतो आणि वाहतूक कोंडी होते. ठाण्याला अटॅक येईल अशी परिस्थिती शनिवारी निर्माण होते, असे पंकज शिरसाठ म्हणाले.