गणेश जाधव यांनी या हंगामात पाच एकर शेतात कापसाची लागवड केली होती. लागवड, औषधं, खतं आणि देखभाल यासाठी त्यांनी जवळपास एक लाख वीस हजार रुपये खर्च केले. कापसावर बोंड येऊ लागलं होतं मात्र त्याआधीच मुसळधार पावसाने सर्व स्वप्नं उद्ध्वस्त केली. महिन्यांनमहिने केलेली मेहनत आणि खर्च आता पाण्यात गेला आहे, असं ते खंतपूर्वक सांगतात.
advertisement
Solapur Flood: 'साहेब आमच्या बांधावर तरी या...', सीनेच्या पुरात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची आर्त हाक
गोदाकाठच्या भागात असलेली ही शेती महापुराच्या पाण्याने अक्षरशः तुडुंब भरून गेली. कापसाचा उभा पीकमाल वाहून गेला आणि शेत रिकामं पडलं. वर्षभराच्या मेहनतीवर एका पावसाने पाणी फेरल्याने जाधव यांचे संसाराचे गणित कोलमडलं आहे. गावातील इतर शेतकऱ्यांसोबतच तेही आता प्रशासनाकडून दिलासा मिळेल, अशी वाट पाहत आहेत.
शेतमजुरीसाठी आवश्यक असलेले बैल खरेदी करण्यासाठी जाधव यांनी सावकाराकडून कर्ज घेतलं होतं. पिकातून येणाऱ्या उत्पन्नातून हे कर्ज फेडायचं होतं मात्र आता उत्पन्न तर मिळालंच नाही उलट कर्जाचं ओझं वाढलं आहे. संसाराचा भार एकीकडे, तर सावकाराचे व्याज दुसरीकडे. कसं निभावायचं तेच कळत नाही, असं सांगताना त्यांचा आवाज कापरा झाला.
सरकारकडून तातडीने मदत जाहीर व्हावी, अशी मागणी जाधव यांच्यासह गावातील इतर शेतकऱ्यांनी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी पूर्णपणे खचले असून शासनाने त्वरित आर्थिक मदत केली तरच या संकटातून त्यांना उभारी मिळेल, अशी कळकळीची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.