Solapur Flood: 'साहेब आमच्या बांधावर तरी या...', सीनेच्या पुरात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची आर्त हाक
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Solapur Flood: काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झालं आहे.
सोलापूर: सोलापूर जिल्ह्यात झालेल्या महाभयंकर पावसाने आणि महापुराने असंख्य शेतकऱ्यांच्या स्वप्नांची राखरांगोळी केली आहे. कालपर्यंत उभी असलेली पीकं चार दिवसांच्या पावसामुळे जमीनदोस्त झाली आहेत. या पिकांसोबत शेतकऱ्यांच्या डोळ्यातील स्वप्न देखील संपुष्टात आली आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील निमगाव या गावातील बाजीराव मुकणे या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचं अतोनात नुकसान झालं आहे. मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून उभी केलेली द्राक्षाची बाग महापुरात उन्मळून पडली आहे.
निमगाव गावातील शेतकरी बाजीराव मुकणे यांची सीना नदीकाठावर 2 एकर शेतजमीन आहे. त्यांनी मोठ्या कष्टाने आणि कर्ज काढून 2020 साली द्राक्षाची बाग लावली होती. पोटच्या मुलाप्रमाणे त्यांनी या बागेची काळजी घेतली. बाग लावल्यापासून दुष्काळ तर कधी रोगराईमुळे 3 वर्ष पीक हाती आलं नाही. त्यामुळे बागेचा खर्चही निघाला नाही. गेल्या वर्षी काही प्रमाणात उत्पन्न मिळालं होतं. त्यामुळे यावर्षी देखील त्यांनी मोठया आशेने बागेसाठी 9 लाख रुपये खर्च केला होता. त्यासाठी त्यांनी कर्जही काढलं होतं. मात्र, मुसळधार पावसामुळे आणि सीनेच्या पुरामुळे होत्याचं नव्हतं झालं आहे. त्यांची द्राक्षाची बाग जमीनदोस्त झाली आहे.
advertisement
बाजीराव मुकणे म्हणाले, ''द्राक्षाच्या बागेवरून 20 फूट पाण्याचा लोट वाहत होता. ते पाहून पोटात गोळा येत होता. राहत्या चार पत्र्यांच्या घरातही पुराचं पाणी शिरलं होतं. जगावं की मरावं? हा एकच प्रश्न डोळ्यासमोर येत होता. आमच्या तालुक्यातील आमदार अभिजीत पाटील (आबा) येतील आणि मदत करतील, या आशेवर संपूर्ण कुटुंब आहे."
advertisement
काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्रातील शेतीचं नुकसान झालं आहे. अशातच धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने सीना नदीला महापूर आला आणि नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरलं. माढा तालुक्यातील अनेक केळी आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या बागा उन्मळून पडल्या आहेत. अनेकांचे संसार सीनेने आपल्यासोबत वाहून नेले आहेत. हे सर्व नुकसानग्रस्त शेतकरी आता सरकारी मदतीच्या अपेक्षेत आहेत.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
September 26, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Solapur Flood: 'साहेब आमच्या बांधावर तरी या...', सीनेच्या पुरात उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याची आर्त हाक