राज्यात मंगळवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी तडकाफडकी दिल्लीत दाखल झाले. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीमध्ये पोहचले. दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी अमित शाहांची निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. या भेटीत भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला हतबल करण्याच्या प्रयत्नांसह काही मुद्यांवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
advertisement
भाजपचे ठाकरे प्रेम, शिंदे नाराज...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची नियुक्ती करण्याच्या निर्णयावरून शिवसेना शिंदे गट नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. अधिकृत शिवसेना म्हणून आपली ओळख असताना स्मारकाच्या अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांची निवड ही पक्षाच्या भूमिकेला डावलणारी आहे. या विषयावर एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे थेट तक्रार नोंदवली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. अध्यक्षपदी उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अन्य कोणाची नियुक्ती केली असती तर निर्णय अधिक योग्य झाले असते, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी आपली नाराजी अमित शाह यांच्याकडे व्यक्त केली.
काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या समितीची घोषणा केली होती. अध्यक्षपदी उद्धव ठाकरे कायम असून ठाकरे गटाचे सुभाष देसाई, आदित्य ठाकरे यांची ५ वर्षांसाठी नेमणूक करण्यात आली आहे. तर, भाजपच्या पराग अळवणी आणि शिशिर शिंदे यांची देखील ३ वर्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांसोबतच्या कार्यक्रमाला शिंदेंची दांडी...
मंगळवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीवर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. मात्र, फडणवीस यांनीच पलटवार करत झापलं होतं. त्यानंतर बुधवारी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतील पोलीस दलाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दांडी मारली. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपात तणाव वाढल्याची चर्चा आणखीच जोर धरू लागली.
