महापालिका निवडणुका जवळ येत असताना भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात जागा वाटपाचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. 227 जागा असलेल्या मुंबई महापालिकेत भाजपने 'मिशन 150' ची घोषणा केली आहे. तर, दुसरीकडे शिंदे गटाने निम्म्या जागांची मागणी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधीच एकनाथ शिंदे यांनी व्यूहरचना आखत 100 हून अधिक माजी नगरसेवक शिवसेनेत खेचले. त्यातील जवळपास 45 नगरसेवक हे ठाकरे गटाचे असून मागील महापालिका निवडणुकीत विजयी झाले होते.
advertisement
जागावाटपावर राजकीय पेच
समोर आलेल्या वृत्तानुसार, मुंबई महानगरपालिकेत शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप युती निश्चित असून, आता वॉर्डनिहाय जागावाटप सुरू होणार आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये युती होणार नाही, तर ठाण्यातील निर्णय प्रलंबित आहे. मात्र मुंबईत दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचे ठरवल्याने 50 वॉर्डांमध्ये स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होऊ शकतो.
शिंदे गटात गेलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या 44 नगरसेवकांनी मागील निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांचा पराभव करून विजय मिळवला होता. दहिसर, अंधेरी, जोगेश्वरी, विक्रोळी, घाटकोपर, गोरेगाव या भागांतील काही वॉर्डांत अत्यंत कडवी लढत झाली होती. त्यामुळे या जागा पुन्हा कोण लढवणार, हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. या जागांवर शिंदे गटाने आपला दावा केला आहे. तर, भाजपही या जागा शिंदेंकडून खेचण्याच्या तयारीत आहे.
ठाकरेंच्या युतीमुळे शिंदे गटासमोर आव्हान...
शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांना आता पुन्हा निवडून येणे सोपे राहणार नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव गट) आणि मनसे एकत्र आल्यास ‘गद्दारांना धडा शिकवा’ ही मोहीम अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
भाजपचा असा तर्क आहे की, ज्याठिकाणी त्यांचे विजयाचे गणित मजबूत आहे, तेथे उमेदवारी त्यांनाच मिळावी. तर मुंबई हा शिवसेनेचा गड असल्याने भाजपने झुकते माप द्यावे, अशी अपेक्षा शिंदे गटाकडून व्यक्त होत आहे.
निर्णायक बैठक लवकरच
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा नोव्हेंबरच्या मध्यास होण्याची शक्यता असल्याने, जागावाटपाचा हा तिढा पुढील काही दिवसांतच सोडवावा लागणार आहे. यासाठी भाजप आणि शिंदे गटातील चर्चा लवकरच सुरू होणार असून, मुंबईतील राजकीय समीकरणांना यामुळे वेग येणार आहे.
