धाराशिव जिल्ह्यातील उमरग्यामध्ये आज शिवसेनेच्या गोटातील नाराजीनाट्याचा अंक समोर आला. पालकमंत्री आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेले पोस्टर आणि बॅनर काही शिवसैनिकांनीच फाडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे स्थानिक राजकारणात नव्या संघर्षाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पालकमंत्री प्रताप सरनाईक हे आज उमरगा बस स्थानकाच्या भूमिपूजनासाठी जिल्हा दौऱ्यावर होते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख भगवान देवकाते यांनी सरनाईक यांच्या स्वागतासाठी शहरातील विविध ठिकाणी आठ ते दहा बॅनर लावले होते. मात्र, या बॅनर्सवर पक्षातील स्थानिक युवा नेते आकांक्षा चौगुले आणि किरण गायकवाड यांचे फोटो नव्हते. या बाबीवरून शिवसैनिकांमध्येच नाराजी उसळली. बॅनरवर प्रतिनिधित्व न मिळाल्याने संतप्त झालेल्या काही कार्यकर्त्यांनी हेच बॅनर फाडल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
बॅनरवरील फोटो नसल्यानं संताप?
शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आकांक्षा चौगुले सध्या मराठवाडा युवती सेनेच्या निरीक्षक पदावर कार्यरत आहे. त्याचप्रमाणे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड हे मराठवाडा युवा सेनेचे निरीक्षक आहेत. या दोघांच्याही फोटोना बॅनरवर स्थान न मिळाल्याने स्थानिक गटात नाराजी निर्माण झाली होती.
पोलिसांचा शोध सुरू
सध्या बॅनर फाडणाऱ्यांचा शोध उमरगा पोलीस घेत आहेत. यामध्ये पक्षांतर्गत संघर्षाचीही शक्यता गृहीत धरली जात असून, पोलीस सूत्रांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.