कुळगाव–बदलापूर नगरपालिका निवडणुकीत शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष सुरुवातीपासूनच तापलेला असताना उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीची लाट शिवसेनेने आपल्या बाजूने खेळवत भाजपला मोठी धक्का दिला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपचे तीन इच्छुक उमेदवार थेट शिवसेनेत दाखल झाल्याने राजकीय समीकरणांत अनपेक्षित उलथापालथ झाली.
एबी फॉर्ममधील गोंधळाचा फायदा शिवसेनेला
भाजपच्या इच्छुकांची कोंडी एबी फॉर्ममुळे झाली. प्रभागात उमेदवारी मागणारे संजय भोईर यांचा भाजपने एबी फॉर्म नाकारत “ग्राह धरू नये” असे पत्र दिले होते. त्यामुळे त्यांचा मार्ग बंद झाला होता. अखेर वामन म्हात्रे यांनी त्यांना शिवसेनेत प्रवेश देत उमेदवारी जाहीर केली. यामुळे संजय भोईर यांनी ऐनवेळी शिंदे गटाची ताकद वाढवली.
advertisement
अशाच प्रकारे भाजपच्या अंजली गीते यांच्याही उमेदवारीत गोंधळ झाला. त्यांना एबी फॉर्म दिल्यानंतरही त्याच प्रभागात दुसऱ्या व्यक्तीचा अर्ज दाखल झाल्याने त्यांची कोंडी झाली. अखेर म्हात्रे यांनी गीते यांनाही थेट शिवसेनेची उमेदवारी ऑफर केली आणि त्यांनीही पक्षात प्रवेश केला.
प्रवेशांची मालिका सुरूच
याआधीच अविनाश भोपी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्मिता कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. ताज्या तीन प्रवेशांमुळे भाजप–राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसला असून, नाराज कार्यकर्त्यांना गळाला लावण्याची शिवसेनेची चाल यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
कुळगाव–बदलापूर नगरपालिकेतील या घडामोडींमुळे शिवसेनेने भाजपवर केलीली सर्जिकल स्ट्राईक यशस्वी ठरल्याचे बोलले जात असून, पुढील दिवसांत संघर्ष अधिक चिघळण्याची चिन्हे आहेत.
