शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीला आता दोन वर्षांहून अधिक काळ उलटला आहे. त्या काळातील काही किस्से अजूनही राजकारणात चर्चेचा विषय ठरत आहेत. शिंदे हे राज्याची सीमा ओलांडून गुजरातमध्ये जाण्याआधीच कैलास पाटील यांनी चकवा देत पुन्हा मुंबई गाठली. तर, नितीन देशमुख हे पुन्हा राज्यात दाखल झाले होते. रविवारी नांदेडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी बंडाच्या काळातील एक धक्कादायक प्रसंग उघड केला.
advertisement
>> काय झालं होतं गुवाहाटीमध्ये?
संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात म्हटले की, गुवाहाटीतील मुक्कामादरम्यान एका आमदाराने नव्या सरकार स्थापनेसाठी आवश्यक आमदारसंख्या पूर्ण न होण्याच्या भीतीने आत्महत्येचा विचार केला होता. हा आमदार म्हणजे नांदेड उत्तर मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर असल्याचे शिरसाटांनी उघड केले.
त्यांनी पुढे म्हटले की, “मी ४२ वर्षांपासून राजकारणात आहे, पण ही माझ्या आयुष्यातील तिसरी बंडखोरी होती. मात्र, कल्याणकरांसाठी ती पहिलीच होती. ते इतके तणावाखाली होते की त्यांनी जेवणसुद्धा बंद केलं होतं. त्यांच्या चेहऱ्यावर सतत भीती होती. ते हॉटेलवरून उडी मारण्याच्या विचारात होते,” असंही त्यांनी म्हटले. आम्ही आवश्यक संख्याबळासाठी एक-एक आमदार जमवत होतो. तर, दुसरीकडे कल्याणकर यांच्या डोक्यात तसा विचार सुरू होता.त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत दोन लोक कायम ठेवले होते, असेही शिरसाट यांनी म्हटले.
>> हिंमत केल्याशिवाय काही होत नाही...
शिरसाट पुढे म्हणाले, “आम्ही तेव्हा राजकारण पणाला लावलं होतं. ‘उद्या वाईट झालं तरी चालेल, पण हिंमत केल्याशिवाय काही होत नाही,’ असं आम्ही त्यांना समजावलं. आज मात्र तेच बालाजी कल्याणकर जोरदार काम करत असून, सर्वाधिक निधी मिळवणारे आणि दुसऱ्यांदा विजयी ठरलेले आमदार असल्याचा उल्लेख शिरसाटांनी केला.
