शिवसेना शिंदे गटाच्या निर्धार मेळाव्यात आमदार किशोर पाटील यांनी भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला. पाटील यांनी म्हटले की, "आमदारांना महायुतीच्या सरकारकडून एक फुटकी कवडीही मिळाली नाही." शिवसेनेच्या पाचही आमदारांनी एकजुटीने निर्णय घेतल्यास जळगाव जिल्हा परिषदेसाठी शिवसेनेचा अध्यक्ष निवडला जाईल, असाही विश्वास व्यक्त करताना भाजपला इशाराही दिला.
advertisement
आमदार किशोर पाटील यांनी भाजपमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना पक्षात सहभागी करण्यावरून टीका केली. "चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूरमध्ये सांगितले होते की, बंडखोरी केल्यावर पाच वर्ष हकालपट्टी होईल. त्यावेळेस मी त्यांना फोन करायचो मात्र ते फोन उचलत नव्हते, ज्यांनी बंडखोरी केली त्यांच्यावर कारवाई न करता पदाच्या रूपाने त्यांना तुम्ही शाबासकी देत आहात, असे म्हणत त्यांनी बंडखोरांना पक्षात घेण्यावरून भाजपवर टीका केली.
लाडक्या बहिणींचा, लाडका भाऊ... एकनाथ शिंदेंवर स्तुतीसुमनं
यावेळी किशोर पाटील यांनी शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली. एकनाथ शिंदे यांच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री काळात त्यांनी एक दिवसाच्या नायक चित्रपटातील मुख्यमंत्र्यासारखं काम केलं असल्याचे त्यांनी म्हटले. सख्ख्या भावाच्या आधी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ एकनाथ शिंदे असल्याचे सांगते. एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेत १५०० रुपये मानधन सुरू केले. या १५०० रुपयांचे महत्त्व ग्रामीण भागातील महिलांना माहित असल्याचे त्यांनी म्हटले.
महायुतीमधून एक फुटकी कवडी नाही...
किशोर पाटील यांनी म्हटले की, महायुतीच्या एक वर्षाच्या काळात एक फुटकी कवडी सुद्धा आमदारांना मिळाली नाही. वर्षभरात एक कवडीही न मिळाल्याने आम्हाला फक्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा आधार असल्याचे सांगितले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन पाच टक्के निधीमधून किमान 50 टक्के निधी हा आपल्या मतदारसंघाला द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली.
आपल्याच सरकारवर टीका...
यावेळी किशोर पाटील यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले. त्यांनी म्हटले की, अतिवृष्टीमुळे शेतकरी उद्धवस्त झाला आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना एक रुपयात पिक विमा योजना सुरू केली. मात्र ही योजना यावर्षी चालू राहिली असती तर शासनाकडे हात पसरवण्याची गरज शेतकरी बांधवांना आली नसती. तुम्ही एक रुपयाचा पिक विमा ही बंद केला आणि आज शेतकरी हवालदिल झाला असल्याचे म्हणत त्यांनी आपल्याच महायुती सरकारवर टीकास्त्र सोडले.
