विभागप्रमुखांच्या नियुक्तीवरून काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या नाराजीवर पडदा टाकण्यासाठी पक्षाने चातुर्याने पावले उचलली आहेत. नाराज माजी विभागप्रमुखांना विभाग समन्वयक आणि शाखा समन्वयक अशी पदे देत त्यांची मनधरणी करण्यात आली आहे. या नव्या रचनेनुसार प्रत्येक वॉर्डात महिला आणि पुरुष अशा मिळून ५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. गेल्या दोन महिन्यांत सुमारे अडीच ते तीन हजार नियुक्त्या झाल्याचे सूत्रांकडून समजते.
advertisement
मतदारयादीवर शिंदे गटाचा वॉच...
मुंबईतील एकूण २२७ वॉर्डांपैकी तब्बल ८० टक्के वॉर्डांमध्ये गटप्रमुखांची नेमणूक पूर्ण झाली आहे. या मोर्चेबांधणीसोबतच आता शिंदे गटाने मतदारांच्या थेट संपर्कावर भर दिला आहे. ‘शिवदूत’ आणि ‘लक्षवेध’ या ॲपच्या माध्यमातून घराघरांत पोहोचून मतदारांची माहिती पडताळण्याचे काम सुरू आहे.
गटप्रमुखांना मतदार याद्यांमधील प्रत्येक नावाची घराघरांत जाऊन तपासणी करण्याचे आदेश दिले असून, यामागे प्रत्येक प्रभागातील संघटनशक्तीचे मूल्यांकन करण्याची रणनीती असल्याचे सांगितले जाते. ज्या भागांत पक्षाचे वर्चस्व कमी आहे, त्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी विभागप्रमुख आणि शाखाप्रमुखांना सोपवण्यात आली आहे.
राज्यातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकून ठाकरेंना धक्का देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी शिंदे गटाने आता पूर्ण ताकदीने ‘ग्राऊंड वर्क’ सुरू केल्याचे स्पष्ट दिसत आहे.
