धाराशिव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाने ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा सुरू केल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांच्या उमरगा येथील निवासस्थानी शिंदे गटाचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी अचानक भेट दिली. या भेटीदरम्यान माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि उमरगा मतदारसंघातील शिंदे गटाचे पराभूत उमेदवार ज्ञानराज चौगुले हेही उपस्थित होते.
advertisement
प्रवीण स्वामी यांनी या ‘गुप्त’ भेटीचे फोटो आणि व्हिडिओ स्वतःहून पत्रकारांना पाठवले. त्यामुळे या भेटीमागचा उद्देश नेमका काय होता, हेच मोठं राजकीय कोडं ठरू लागलं आहे. स्वामी काय सूचित करू इच्छितात? ते पक्षात आहेत की मनात काही वेगळं आहे? या प्रश्नांची चर्चा जिल्हाभरात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे, आमदार प्रवीण स्वामी यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत सरनाईक यांचं स्वागत केलं. जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रताप सरनाईक यांचा दौरा आधीच नियोजित होता, मात्र ते थेट ठाकरे गटाच्या आमदाराच्या घरी पोहोचतात, आता ही बाब योगायोग समजावे की रणनीती? याची चर्चा रंगू लागली आहे.
विधानसभेत शिंदेंच्या शिलेदाराचा पराभव...
धाराशिव जिल्हा म्हणजे शिवसेनेच्या अंतर्गत हालचालींचं केंद्र बनलेलं दिसत आहे. याच जिल्ह्यात एकेकाळी तीन वेळा आमदार राहिलेले आणि एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मानले जाणारे ज्ञानराज चौगुले, 2024 च्या निवडणुकीत फक्त दीड हजार मतांनी पराभूत झाले होते. ठाकरे गटाच्या प्रवीण स्वामी यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. सरनाईकांच्या भेटीच्या वेळी चौगुले यांचीदेखील उपस्थितीही होती.
ठाकरेंना धक्का?
ठाकरे गटाचे आमदार, खासदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी सरनाईकांचे स्वागत केले. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच सरनाईक यांनी धाराशिवमध्ये ऑपरेशन टायगरचे सुतोवाच केले होते. धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या दोन गटांमध्ये सुरु असलेली जवळीक आणि हालचाल राजकीय ‘धमाका’ करून जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे म्हटले जात आहे.