काय आहे भाजपची नवी अट?
मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार गटातील नाराज खासदार जर महायुतीत येणार असतील, तर त्यांनी शिंदे गटात न जाता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील अजित पवार गटात सामील व्हावे, अशी भूमिका भाजप श्रेष्ठींनी घेतली असल्याचे वृत्त 'दैनिक पुढारी'ने दिली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व मजबूत करण्यासाठी भाजपने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात असले तरी भाजपची भूमिका वेगळीच असल्याची चर्चा रंगली आहे.
advertisement
शिंदेंची आक्रमकता भाजपला खटकली?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाकरे गट आणि पवार गटाचे खासदार स्वतःकडे खेचून केंद्रात आणि राज्यात आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, शिंदेंची ही वाढती शक्ती भविष्यात भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकते, असा अंदाज दिल्लीतील धुरिणांनी बांधला आहे. शिंदे यांच्या विस्तारवादी धोरणामुळे महायुतीतील अंतर्गत संतुलन बिघडू नये, यासाठी भाजपने शिंदेंच्या या 'फिल्डिंग'ला तूर्तास ब्रेक लावला आहे.
राष्ट्रवादीला भाजपचे बळ...
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि केंद्रातील सत्तेचे समीकरण पाहता, अजित पवार यांच्या हयातीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण झाले असते तर राष्ट्रवादीचे महत्त्व वाढले असते. अजित पवारांसारखा पर्याय मजबूत झाला असता आणि सत्तासमीकरणात एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वकांक्षेलाही लगाम लावता आला असता.
आता अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या गटातील आमदार आणि शरद पवार गटाचे नाराज खासदार शिंदे गटाकडे वळू नयेत, यासाठी भाजप पूर्णपणे सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी उभी राहिली असल्याचे चित्र आहे. त्यामुळे भाजपकडून महायुतीमधील सत्ता समीकरणात समतोल राखण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.
