महायुतीमधील सत्ता वाटपाचा तिढा सोडवण्याच्या दृष्टीने मंगळवारी सायंकाळनंतर मोठ्या घडामोडी घडल्या. काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहभागावर चर्चा सुरू आहे. एकनाथ शिंदे हे मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, याची चर्चा सुरू होती. आता, उदय सामंत यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
advertisement
उदय सामंत यांनी काय म्हटले?
शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे हे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात असावे अशी आमची मागणी आहे. एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात असावे ही आमची आग्रही मागणी एकनाथ शिंदे मान्य करतील असा विश्वास वाटत असल्याचे सामंत यांनी सांगितले.
शिंदे यांनी मंत्रिमंडळात का राहावं?
उदय सामंत यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावे, अशी इच्छा आमचीच नसून सामान्य शिवसैनिकाचीदेखील इच्छा आहे. ही आमची मागणी मान्य करतील असेही त्यांनी म्हटले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. या निर्णयाच्या परिणामी महायुती सरकार प्रचंड बहुमताने सत्तेवर आले. या योजनांसाठी त्यांनी मंत्रिमंडळात राहावे असेही सामंत यांनी म्हटले.
