ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी संपन्न झाली. सरकार स्थापन होऊन तब्बल आठ महिने झाले तरीही ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली नव्हती. अखेर शुक्रवारी चर्चित बैठक संपन्न झाली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना झापले
advertisement
ठाणे शहराकरीता स्वतंत्र धरणाचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी जमीन अधिग्रहण करीता पैसेही दिलेत, मग काम का थांबले? अशी विचारणा करून फटाफट कामे मार्गी लावा, असे निर्देश शिंदे यांनी दिले. तसेच काळू धरणाकरीता आपण किती वर्षे प्रयत्न करतोय. त्याचे काम संथ गतीने का सुरू आहे. टाईमबॅान्ड घेऊन काम पूर्ण करा, असे शिंदे म्हणाले.
याचवेळेस मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी सत्य परिस्थिती मांडली. पैसे दिल्या शिवाय, जमीन अधिग्रहण केल्याशिवाय पुढची कामे होणार नाहीत. बारवी धरणाचा आमचा अनुभव उराशी आहे, असे किसन कथोरे म्हणाले. दुसरीकडे भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी देखील यावर नाराजी व्यक्त करत सलग बैठका घेतल्या पाहिजेत आणि हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे, असे म्हणाले. अधिकारी वेगाने काम करत नाहीयेत. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. आमच्या हक्काचे धरण झालेच पाहिजे, अशी भूमिका संजय केळकर यांनी मांडली.
ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक तब्बल आठ महिन्यांनंतर
वेगाने वाढणारे नागरीकरण, त्याचबरोबर वाढणारी वाहतूक कोंडी, नागरी प्रश्न आणि शहराच्या चौफेर विकासासाठी लोकप्रतिनिधींसमोर नियोजन समिती हेच माध्यम असते. मात्र राज्यातल्या जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठका नियमितपणे संपन्न होत असताना ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना मुहूर्त मिळत नव्हता. अजेंड्यावरचे विषय मांडता येत नाही किंबहुना कामांविषयी चर्चा होत नसल्यामुळे लोकप्रतिनिधी नाराज होते. अखेर सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींच्या नाराजीची दखल घेऊन शुक्रवारी नियोजन समितीची बैठक संपन्न झाली.