बुलढाणा जिल्ह्यातील १० नगरपालिकेचे अध्यक्ष आणि १२२ प्रभागाचे नगरसेवक निवडण्यासाठी सकाळी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. बुलढाणा शहरातील गांधी प्राथमिक शाळेमध्ये असलेल्या मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर बोगस मतदान करण्यासाठी आलेल्या तिघा जणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
बोगस मतदाराला पळून जायला मदत केली, आमदार पुत्रावर गुन्हा दाखल
तसेच शासकीय तंत्रनिकेतन केंद्र येथील मतदान केंद्रावर दुसऱ्याच्या नावावर मतदान करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला नागरिकांनी पकडले. त्याला पोलीस ताब्यात घेत असतानाच त्यास पळून जाण्यास आमदार पुत्राने मदत केली. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा आणि प्रभागाचे उमेदवार कुणाल गायकवाड आणि पुतण्या श्रीकांत गायकवाड यांच्या विरुद्ध बुलढाणा शहर पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
advertisement
रोहित पवार यांनीही ट्विट करून संजय गायकवाड यांना सुनावले
आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत. बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने व पुतण्याने पोलिसांशी हुज्जत घालून बोगस मतदाराला पळवून लावले. यावरून सत्ताधारी लोक मतदान प्रक्रियेत दिवसाढवळ्या किती घोळ घालत आहेत हेच दिसून येतं. सत्ताधारी लोक सातत्याने बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रिया प्रभावित करत असून आयोग मात्र झोपा काढत आहे. मालकांविरोधात काहीच करायचं नाही, हे आयोगाने ठरवलंय का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी केला आहे.
