धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परांडा नगरपरिषदेत बोगस मतदार नोंदणीचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. एका घराच्या पत्त्यावर तब्बल 37 वेगवेगळ्या जाती-धर्माच्या मतदारांची नोंदणी केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
सामाजिक कार्यकर्ते अरबाज पठाण यांनी केलेल्या तक्रारीनुसार, परांडा नगरपरिषद क्षेत्रातील एका घराचा पत्ता वापरून ३७ व्यक्तींची मतदार यादीत नोंद केली गेली आहे. या यादीत हिंदू, मुस्लिम, दलित, माळी, ब्राह्मण अशा विविध समाजघटकांतील लोकांचा समावेश आहे. इतकेच नव्हे, तर उत्तर प्रदेशातून आलेल्या 5 मजुरांचाही समावेश असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, ज्या घराच्या पत्त्यावर ही नोंदणी करण्यात आली, ते घर शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाचे असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
तक्रार दाखल...
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता धोक्यात आल्याने या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. परांडा विधानसभेची निवडणूक अतिशय चुरशीची झाली होती. अवघ्या दीड हजार मतांच्या फरकाने शिवसेना शिंदे गटाचे तानाजी सावंत विजयी झाले होते.
दरम्यान, मतदारयादीच्या मुद्यावरुन राज्यात विरोधकांनी 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. तर, विरोधकांकडून पराभवाआधीच कांगावा केला जात असल्याची टीका महायुतीने केली आहे. मात्र, महायुतीच्या नेत्यांकडून विरोधकांच्या आरोपांना बळ देणारी वक्तव्ये केली जात आहे.