महाडमध्ये आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते अमित मोरे यांनी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. पक्षप्रवेशावेळी अमित मोरे यांचे भाजपमध्ये स्वागत करताना जिल्हाध्यक्ष धैर्यशिल पाटील यांनी महाड आणि रायगड जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी संघटनात्मक कामाला गती देण्याचा विश्वास व्यक्त केला.
advertisement
अमित मोरे हे महाड तालुक्यातील विन्हेरे जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी सदस्य राहिले आहेत. स्थानिक राजकारणात त्यांची चांगली ओळख असून ग्रामपातळीपासून जिल्हा परिषदपर्यंत त्यांचे सक्रिय काम राहिले आहे. विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि संघटनात्मक बांधणी यावर त्यांनी भर दिल्याने त्यांचा मोठा जनसंपर्क आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपप्रवेशाकडे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून पाहिले जात आहे.
पक्षप्रवेशानंतर बोलताना अमित मोरे यांनी भाजपच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास व्यक्त केला. केंद्र आणि राज्यात भाजप सरकारने राबवलेल्या योजनांमुळे सर्वसामान्य जनतेला लाभ होत असल्याचे त्यांनी सांगितले. महाड आणि रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपच्या माध्यमातून काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजप–राष्ट्रवादी युतीकडून अमित मोरे हे आगामी काळात महाडच्या विन्हेरे जिल्हा परिषद मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी त्यांच्या पक्षप्रवेशामुळे निवडणूक तयारीला वेग येण्याची शक्यता आहे. एकूणच, या घडामोडीमुळे रायगड जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून येत्या काळात आणखी राजकीय हालचालींची चिन्हे आहेत.
