नेमकं प्रकरण काय?
आरोपी गौरी वांजळे हिने पती-पत्नीच्या कौटुंबीक वादातील प्रकरणात मदत करण्याच्या बहाण्याने तिने एका व्यक्तीकडे तब्बल दोन लाख रुपयांची खंडणी मागितल्याचं उघड झालं आहे.
मुंढवा पोलीस ठाण्यातील खंडणी प्रकरण
मुंढवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गौरी वांजळे हिच्याविरोधात एका ३८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी यांचे त्यांच्या पत्नीसोबत कौटुंबीक न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण सुरू आहे. या केसमध्ये 'हायकोर्टातील वकील' असल्याचे भासवून गौरी वांजळे हिने फिर्यादीशी जवळीक साधली.
advertisement
केसमध्ये मदत करते असे सांगून तिने आधी फिर्यादीला विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांच्यासोबत लगट करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर ब्लॅकमेलिंग सुरू केले. त्यांच्याकडे दोन लाख रुपयांची खंडणी मागून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहेत.
कोथरूडमधील अत्याचाराचा गुन्हा
गौरी वांजळे हिच्या विरोधात कोथरूड पोलीस ठाण्यात यापूर्वीच एका तरुणाच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. पीडित तरुणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, 'वकील' असल्याची बतावणी करून या महिलेने फिर्यादीला सतत धमकावले. तसेच या महिलेने पीडित पुरुषाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला आणि त्याचे काही अश्लील फोटो काढले. याच फोटोंच्या आधारावर ती फिर्यादीकडे मोठ्या रकमेची मागणी करत होती. पैशांची मागणी पूर्ण न केल्यास 'खोट्या केसमध्ये अडकवण्याची' धमकीही ती देत होती.
वाराणसीला फिरायला घेऊन जात अत्याचार
आरोपी महिलेने तिच्या पुणे येथील राहत्या घरी तसेच कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरी जाऊनही त्याच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याहूनही धक्कादायक म्हणजे, तिने फिर्यादीला बळजबरीने धार्मिक स्थळ असलेल्या वाराणसी (काशी विश्वनाथ) येथेही नेले आणि तिथेही त्याच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. एकाच महिलेवर दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात खंडणी आणि अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्याने पुण्यात खळबळ उडाली आहे.
