वर्धा, 25 डिसेंबर : वर्ध्यातील कारंजा इथं दरोड्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये 7 ते 8 जणांच्या टोळक्यांनी घातलेल्या या दरोड्यात 55 पोती सोयाबीन आणि दागिने लुटून नेण्यात आले आहेत. यावेळी दरोडेखोरासोबत झालेल्या झटापटीत एकाच्या पोटात धारदार शस्त्राने भोसकलं असून जखमीला तातडीने उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी तपास सुरू केला असून खळबळ उडाली आहे.
advertisement
नागपूर येथील नारायण पालिवाल यांचे वर्ध्याच्या कारंजा तालुक्यातील वाघोडा शिवारातील शेतात फार्महाऊस आहे. आठवड्यातून एकदा ते या फार्महाऊसवर येत असतात. त्यांचे पिक आणि शेतीचे उत्पन्न याच फार्महाऊसवर ठेऊन असते. रविवारी रात्री ते आपल्या शेतातील फार्महाऊसवर हजर असताना मध्यरात्री दरम्यान दोन जणांनी त्यांचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या मुलाने दरवाजा उघडताच आलेल्या दोघांनी त्यांना धमकावणे सुरू केले, ही झटपट सुरू असतानाच 5 ते 6 जण अचानक तिथे आले आणि त्यांनी त्यांना मारण्यास आणि धमकविण्यास सुरुवात केली, यावेळी फार्महाऊसवर नारायण पालिवाल (80 वर्ष ), त्यांचा मुलगा गोपाल पालिवाल (50 वर्ष ), हरिकुमारी पालिवाल ( 70 वर्ष) हे हजर होते. यांच्या सोबत झटापटीत दरोडेखोरांनी गोपाल पालिवाल यांच्या पोटात चाकू खुपसला आणि त्याची आई हरिकुमारी पालिवाल यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि कानातील दागिने हिसकावून घेतले.
(मोठी बातमी! नागपुरात सुरक्षा रक्षकाला मारहाण करत 6 विधिसंघर्षग्रस्त मुलं रिमांड होममधून पळाले)
सोबतच तिथे ठेऊन असलेले 55 पोते सोयाबीन लंपास केले. रविवारच्या मध्यरात्री हा सर्व थरार सुरू होता. पालिवाल कुटूंब हे चार चाकी वाहनाने आपल्या फार्महाऊसवर आले होते. दरोडा पडल्यानंतर दरोडेखोरांनी पालिवाल कुटुंब हे पोलिसांपर्यंत पोहचू नये यासाठी यांच्या चारचाकी वाहनाच्या चाकातील हवा सोडली. कुणाला संपर्क करू नये यासाठी त्यांचे मोबाईल सुद्धा हिसकावून नेले. या घटनेचा तपास कारंजा पोलीस करीत आहे.
