भिवंडी: मुंबईजवळील भिवंडीमधून एक ह्रदयद्रावक बातमी समोर आली आहे. भोईरगाव हद्दीतील कंटेनर आणि दुचाकीच्या अपघातात 8 वर्षांच्या लेकीसह वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धक्कादायक म्हणजे, 15 दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी तालुक्यातील भोईरगाव हद्दीतील साईधाराजवळ ही घटना घडली. नाशिककडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनर ट्रकने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सईम खोत ( वय 48 वर्षीय)आणि मुलगी मरियम खोत ( अंदाजे वय 8 वर्षे) या बाप लेकीचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. तर सुबी सहिम खोत ही गंभीर रित्या जखमी झाली असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
पडघ्या जवळील बोरिवली गावातील सहिम मकबूल खोत हे आपल्या पत्नी आणि मुलीसह दुचाकीवरून भिवंडीच्या दिशेने जात होते. भोईर गावाच्या हद्दीतील साईधारा इथं पोहोचले असता पाठीमागून आलेल्या भरधाव कंटेनरनं दुचाकीला जोराची धडक दिली. जोराची धडक बसल्यानंतर दुचाकीवरील खोत कुटुंबीय खाली कोसळले. दुर्दैवाने मरियम खोत आणि सईम खोत हे कंटेनरच्या चाकाखाली सापडले. या अपघातात बापलेकीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. तर सुबी खोत ही महिला गंभीर जखमी आहे. त्यांना तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
15 दिवसांत बाप लेकीच्या अपघाती मृत्यूची पुनरावृत्ती
5 सप्टेंबर रोजी अशीच एक घटना घडली होती. मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील डोहळे गावाचे हद्दीत साईधाम लॉजिस्टनसमोर एका दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झाला होता. मुंबईवरून नाशिकच्या दिशेनं जाणाऱ्या दुचाकीस्वारीला पाठीमागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली होती. या घटनेत शहापूर तालुक्यातील सरलांबे गावातील राजेश अधिकारी (वय 39) आणि त्यांची मुलगी वेदिका अधिकारी (वय 11 वर्षे) या दोघा बापलेकींचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली होती.