बड्या नेत्याचा राजीनामा
दरम्यान, आज (दि. १६) नाशिक महापालिकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून, त्याआधीच शहराच्या राजकारणात एक मोठी आणि महत्त्वाची घडामोड घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नाशिक शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
advertisement
गजानन शेलार यांचे पुतणे बबलू शेलार हे भाजपकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक रिंगणात उतरले होते. या कौटुंबिक राजकीय समीकरणामुळे गजानन शेलार यांना यापूर्वीच काही प्रमाणात माघार घ्यावी लागली होती. आता त्यांनी थेट पक्षपदाचा राजीनामा दिल्याने नाशिकमधील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शेलार पुढे कोणत्या पक्षात प्रवेश करतात, की स्वतंत्र राजकीय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या निर्णयाचा महापालिकेच्या निकालावर आणि पुढील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो? हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आज फैसला होणार
नाशिक महानगरपालिकेच्या एकूण १२२ जागांसाठी यावेळी तब्बल ७३५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यामध्ये ५२७ उमेदवार विविध राजकीय पक्षांचे असून, २०८ उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांमध्ये अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढती पाहायला मिळत आहेत. काही प्रभागांमध्ये तर त्रिकोणी आणि चौरंगी लढतीमुळे निकाल अंदाज बांधणे कठीण झाले आहे.
या निवडणुकीसाठी एकूण १३ लाख ६० हजार ७२२ मतदार नोंदणीकृत आहेत. यामध्ये ६ लाख ५६ हजार ६७५ महिला मतदार, ७ लाख ३ हजार ९६८ पुरुष मतदार आणि ७९ तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. मोठ्या प्रमाणावरील मतदारसंख्या, वाढती मतदान टक्केवारी आणि घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे नाशिक महापालिकेचा निकाल अत्यंत महत्त्वाचा आणि राज्याच्या राजकारणावर परिणाम करणारा ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
