नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गिधाडी येथील रहिवासी अश्विनी कटरे या आपल्या वडिलांसह दुचाकीने गोरेगाववरून स्वगावी जात होत्या. घोटी येथील नाल्याजवळ एका निळ्या रंगाच्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात अश्विनी गंभीर जखमी झाल्या. सुरुवातीला हा निव्वळ अपघात वाटत होता, मात्र अश्विनी यांच्या तक्रारीनंतर गोरेगाव पोलिसांनी जेव्हा तपास सुरू केला, तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले.
advertisement
६० लाखांची विमा रक्कम ठरली जीवावर
पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीदारांच्या आधारे तपास केला असता, हा अपघात नसून एक सुनियोजित कट असल्याचे निष्पन्न झाले. अश्विनी यांचे पती उमेष कटरे यांच्या निधनानंतर त्यांच्या नावे असलेले एलआयसीचे ६० लाख रुपये आणि हक्काची जमीन अश्विनी यांना मिळणार होती. ही संपत्ती सुनेला मिळू नये, या हव्यासापोटी सासरा चुडामन कटरे याने सुनेचा काटा काढण्याचे ठरवले.
३ लाखांची दिली सुपारी
सासरा चुडामन याने सुनेला जीवे मारण्यासाठी दोन गुंडांना ३ लाख रुपयांची सुपारी दिली होती. ठरल्याप्रमाणे आरोपींनी निळ्या रंगाच्या कारने अश्विनी यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने, या जीवघेण्या हल्ल्यातून अश्विनी बचावल्या.
एकाला अटक, सासरा व अन्य आरोपी फरार
या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तपासाच्या गोपनीयतेसाठी त्याचे नाव अद्याप गुप्त ठेवण्यात आले आहे. मुख्य सूत्रधार सासरा चुडामन कटरे आणि अपघातातील इतर आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
