अंकिता पाटील-ठाकरे या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या असून त्यांनी आपल्या कार्यशैली आणि जनसंपर्काच्या जोरावर राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी इंदापूर तालुक्यात सर्वाधिक मतांनी विजय मिळवत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली.
हर्षवर्धन पाटलांच्या लेकीवर राष्ट्रवादीकडून मोठी जबाबदारी
विशेष म्हणजे त्या सलग दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेत निवडून आल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यांच्या या विजयानंतर पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवत महिला आणि बालकल्याण सभापतीपदाची धुरा दिली आहे.
advertisement
अंकिता पाटील-ठाकरे यांच्या निवडीने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून महिला व बालकल्याण क्षेत्रात अधिक प्रभावी काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
विलिनीकरणाच्या चर्चा, इंदापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भरणे-हर्षवर्धन पाटलांच्या मुलांच्या अंगावर गुलाल
जिल्हा परिषद निवडणुकीवेळी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या. त्याचवेळी घड्याळ चिन्हावरच दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करावेत, असे पक्षनेतृत्वाचे ठरले. त्याचमुळे दत्ता भरणे आणि हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येऊन राष्ट्रवादीचा प्रचार केला. बावडा गटातून अंकिता ठाकरे पाटील विजयी झाल्या तर श्रीराज भरणे इंदापूर पंचायत समितीच्या बोरी गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विजयी झाले.
