इतिहासानुसार, ब्रिटिश अधिकारी रँड यांच्या हत्येपूर्वी चाफेकर बंधूंनी याच मारुतीच्या मूर्तीसमोर देशसेवेची शपथ घेतली होती. 1897 साली झालेल्या या घटनेनंतर संतप्त झालेल्या ब्रिटिश सत्ताधाऱ्यांनी चाफेकर बंधूंना अटक केली आणि त्यांच्याशी संबंधित ही मूर्तीही जप्त केली. तेव्हापासून आजपर्यंत, सुमारे 125 वर्षांपासून ही मूर्ती फरासखाना पोलीस ठाण्यातच जतन करण्यात आली आहे.
पुणे हे स्वातंत्र्यलढ्याचे महत्त्वाचे केंद्र मानले जात होते. सदाशिव पेठेत राहणारे चाफेकर बंधू देशभक्त तरुणांना व्यायाम, कुस्ती आणि दांडपट्टा यांसारख्या पारंपरिक शस्त्रकला शिकवत असत. त्याचबरोबर त्यांनी पर्वती टेकडीवर गोफन चालविण्याचा एक प्रकारचा क्लबही सुरू केला होता. गोफन हे त्या काळात शस्त्रासारखे वापरले जात असे.
advertisement
या उपक्रमासाठी तरुणांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांनी शक्तीचे प्रतीक मानून मारुतीची स्थापना करण्याचे ठरवले. कथेनुसार, चाफेकर बंधूंना स्वप्नात मारुतीने दृष्टांत दिला आणि पर्वती टेकडीवरील एका लिंबाच्या झाडाखाली मूर्ती असल्याचे सांगितले. त्यानुसार शोध घेतल्यावर त्यांना ती मूर्ती सापडली आणि तिथेच तिची स्थापना करण्यात आली.
नंतरच्या काळात चाफेकर बंधूंना अटक झाल्यानंतर त्यांनी ही प्रेरणादायी मूर्ती पोलीस ठाण्यात मागवून घेतली. आजही ही मूर्ती तेथे सुरक्षित आहे. या मारुतीची मूर्ती लहान आकाराची असून एका हातात गदा, दुसऱ्या हातात पर्वत आणि पायाखाली राक्षस दाबलेला असा तिचा देखावा आहे.
इतिहास अभ्यासक सुप्रसाद पुराणिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचे संदर्भ दामोदर हरी चाफेकर यांच्या आत्मवृत्तात तसेच मृत्युंजयांचा आत्मयज्ञ यांसारख्या पुस्तकांमध्येही आढळतात. आजही गोफन्या मारुती ही मूर्ती पुण्याच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासाची साक्ष देत उभी आहे आणि क्रांतिकारकांच्या शौर्याची प्रेरणा देत आहे.





