कोल्हापूर : राज्यातील ज्येष्ठ नेते आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी ऐन स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा दावा केला आहे. ईडीकडून माझी निर्दोष सुटका आधीच करण्यात आली असल्याचा दावा मुश्रीफ यांनी केला आहे. मुश्रीफ यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेली चौकशी, छापेमारी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर हा दावा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
advertisement
हसन मुश्रीफ हे महाविकास आघाडीच्या काळात एकसंध असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मंत्री होते. त्यांच्याविरोधात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आरोपांची राळ उडवत मुश्रीफांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. त्यानंतर मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीने गुन्हे दाखल करत चौकशी सुरू केली होती. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर मुश्रीफ यांनी शरद पवारांची साथ सोडत अजित पवारांसोबत गेले होते.
मुश्रीफ यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली होती. कागल येथील त्यांच्या निवासस्थानी सलग अनेक तास छापे घालण्यात आले. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर सार्वजनिकरीत्या मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोपांची सरबत्ती केली होती. कागलमधील काही महत्त्वाच्या संस्थांमधील आर्थिक अनियमितता आणि मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. या प्रकरणामुळे मुश्रीफ यांच्या राजकीय कारकिर्दीवर मोठे संकट ओढवले होते. मात्र, आता मुश्रीफ यांनीच मैदानात येऊन आपण सर्व आरोपांतून निर्दोष ठरलो असल्याचे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळात नवीन चर्चा सुरू झाली आहे.
मंडलिकांचा वार, मुश्रीफांचा पलटवार...
हसन मुश्रीफ यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधी संवाद साधताना विविध आरोपांना उत्तर दिले. कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून समरजीत घाटगेंसोबत मुश्रीफांनी युती केली. हसन मुश्रीफ आणि समरजीत घाटगे यांनी कागलच्या विकासासाठी नाही तर ईडी पासून वाचण्यासाठी आणि जमीन मिळण्यासाठी केल्याचा आरोप माजी खासदार संजय मंडलिक यांनी केला. त्यावर मुश्रीफ यांनी उत्तर देताना म्हटले की, मांडलिकांचे अज्ञान आहे. माझ्यावरील सर्व आरोप मागे घेण्यात आले आहेत. माझी निर्दोष सुटका करण्यात आली आहे. ईडीकडून माझ्याविरोधात एकही गुन्हा नाही, असे मुश्रीफ यांनी म्हटले. मुश्रीफ यांनी मंडलिकांवर पलटवार करताना म्हटले की, मी तोंड उघडले तर बात दूर तक जायेगी, त्यांनी आता तोंड आवरावे असा इशारा दिला आहे. त्यामुळे मुश्रीफ आणि मंडलिक या दोघांच्या संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
