कोकणात रेल्वेसेवा विस्कळीत : कोकण रेल्वेचे वेळापत्रक पावसामुळे पुरते कोलमडले आहे. परणेम येथे बोगद्यात पाणी आणि माती आल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याची माहिती आहे. सिंधुदुर्गात कणकवलीमध्ये एर्नाकुलम एक्सप्रेस, कुडाळमध्ये तेजस एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्या गेल्या काही तासांपेक्षा जास्त काळापासून उभ्या आहेत. प्रवाशांना कोणत्याही सूचना रेल्वे प्रशासकांकडून देण्यात आल्या नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी पाहायला मिळतं आहे.
advertisement
नारायण राणेंनी घेतला आढावा: खासदार नारायण राणे यांनी पूरस्थितीची पाहणी केली. भाताची आणि भातशेतीची पाहणी करण्यासाठी नारायण राणे राजापूरात आज दुपारी दाखल झाले होते. यावेळी नारायण राणेंनी स्थानिक नागरिकांंशी चर्चा केली. तसेच निर्माण होणाऱ्या पुरस्थितीवर कायमचा तोडगा कसा काढता येईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत, असं नारायण राणे म्हणाले. राणेंनी आश्वासन दिलं असलं तरी इतकी वर्षे ही समस्या का सुटली नाही, असा सवाल स्थानिक राजकीय नेत्यांकडून उपस्थित केला जात आहे.
एका चापटीत वाहक बेशुद्ध, धावत्या एसटी बसमध्ये कंडक्टर आणि प्रवाशी भिडले, VIDEO
यावेळी नारायण राणेंनी काही राजकीय मुद्द्यांवर देखील भाष्य केलं , "कोकणात आगामी काळात रिफायनरी आणण्यासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. काहीजण राजकीय हेतूने आणि आर्थिक हितसंबंधांसाठी या प्रकल्पांना विरोध करत आहेत. इथल्या गरिबांना रोजगार आणि पैशांची गरज आहे, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे." असं राणे म्हणाले. तसेच आगामी विधानपरिषदेची निवडणूक, मिलिंद नार्वेकर आदी विषयांवरक बोलणं मात्र नारायण राणेंनी टाळलं.
प्रशासन, आपत्ती यंत्रणा अलर्ट: वाढणारा पाऊस पाहता प्रशासन, स्थानिक बचाव पथके आणि आपत्ती निवारण यंत्रणेनं सज्ज रहावं, अशा सूचना नारायण राणेंनी केल्या आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाचा धोका कायम आहे. नदीकाठच्या नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं प्रशासन सातत्याने सांगत आहे. चिपळूण जगबुडी नदीच्या पाणी पातळीकडे विशेष लक्ष आहे. एकंदरीतच पुढील काही दिवस कोकणवासियांनी काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे
