याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हवामान विभागाने आजपासून (28 सप्टेंबर) राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली होती. मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला होता. या अंदाजानुसार मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शहापूर तालुक्यात रात्रभर पासून तुफान पाऊस पडत असल्याने सर्वदूर पाणी साचलं आहे.
Rain Update: भर दुपारी अंधार! मुंबईसह ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपलं, रेड अलर्टचा धोका कायम
advertisement
नदी-नाल्यांना पूर आल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. परिणामी भातसा धरणाचे 5 दरवाजे अडीच मीटरने उघडले आहेत. धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने शहापूर- सापगाव-किन्हवली रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद झाली असून एकूण 40 गावांचा संपर्क तुटला आहे. सापगावातील अनेक रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं असून गावात पूरस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. प्रशासन आणि जीवरक्षक टिमचे सदस्य परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
दरम्यान, ठाणे शहराला देखील पावसाने झोडपून काढलं आहे. ठाण्यात आतापर्यंत 115 मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. अजूनही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असं प्रशासनाने आवाहन केलं आहे.