हिंगोली : दारात मांडव पडला... घरात लगीन घाई सुरू होती, नातेवईकांची देखील लगबग सुरू होती.. कारण अवघ्या १५ वर्षाची नवरी ही सजण्याच्या तयारीत होती. पण तिला याची कल्पना होती की आजच्या सोहळ्यानंतर तिचे बालपण आणि स्वप्न दोन्ही कायमची कोमेजून जाणार होती. आपल्या पुढील आयुष्याची राखरोंगळी होण्यापासून रोखण्यासाठी सावित्रीची लेक स्वत: पुढे आली आणि विवाह रोखला. हिंगोलीत या अल्पवयीन मुलीच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
advertisement
सावित्रीबाईंसह अनेकांनी ज्या भूमीत अनिष्ट प्रथांचा भार झुगारला, त्याच महाराष्ट्रात हजारो मुली कोवळ्या वयात संसाराचा भार वाहत आहेत. 'मुलगी शिकली, प्रगती झाली" असे आपण म्हणतो, परंतु ग्रामीण भागात अनेकदा मुलींना मनासारखे शिक्षण घेता येत नाही. कमी वयातच त्यांची लग्न उरकली जातात. परंतु हिंगोली जिल्ह्यातील एका 15 वर्षीय मुलीने मात्र धाडस दाखवत आपला होणारा बालविवाह रोखण्यासाठी थेट शाळेच्या मुख्याध्यापकांनाच पत्र लिहून विनंती केली. मला शिकायचं आहे, परंतु घरच्यांनी माझं लग्न पंचवीस वर्षीय मुलाशी ठरवल आहे. मला आत्ताच लग्न करायचं नाही, माझं लग्न थांबवा. अशा आर्त आशयाचे पत्र तिने आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलं.
प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीकडे जाणार
विद्यार्थिनीच्या या पत्रानंतर मुख्याध्यापकांनी देखील तत्परता दाखवून होणारा हा बालविवाह रोखण्यासंदर्भात ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीला कळवलं. आज बाल संरक्षण समिती व महिला बाल विकास विभागाच्या चाइल्ड हेल्पलाइनने या मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली, त्यांचे समुपदेशन केलं. सध्या ही मुलगी दहावीच्या वर्गात शिकत असून तिची सराव परीक्षा देखील सुरू आहे. प्रशासन बालविवाह रोखण्यासंदर्भात गावागावात जनजागृती करत आहे. या जनजागृतीमुळे व शिक्षणाच्या लागलेल्या गोडीमुळे या मुलीने घरच्यांच्या विरोधात जात धाडस दाखवले. मुख्याध्यापकांना ही बाब कळवल्यामुळे हा होणारा बालविवाह रोखण्यास मदत झाली आहे. आता ग्रामस्तरीय बाल संरक्षण समितीकडून हे प्रकरण जिल्हा बालकल्याण समितीकडे जाणार आहे.
मुलीच्या धाडसाचे कौतुक
ग्रामीण भागात बालविवाहासारख्या प्रथांविरुद्ध बोलण्यास मुली धजावत नाहीत. मात्र, या 15 वर्षीय मुलीने समाजाची आणि घरच्यांची पर्वा न करता, स्वतःचे भविष्य वाचवण्यासाठी जे पाऊल उचलले, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कोवळ्या वयात आई वडील, आणि नातवाईकांच्या विरोधात बंड पुकारले समाजाविरोधात कायद्याच्या चौकटीत माणूस म्हणून जगण्यासाठी पुकारलेल्या या बंडाचे कौतुक होत आहे.
हे ही वाचा :
