Nashik Crime : नाशकात 9 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा वारंवार अत्याचार, तब्बल 8 महिने दिल्या नरक यातना, आजीला संशय आला अन्...
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Nashik Crime News : पीडितेने धाडस करून 16 जानेवारी रोजी हा सर्व प्रकार आपल्या आजीला सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने घोटी पोलीस स्टेशन गाठून या नराधम शिक्षकाविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली.
Nashik Crime News : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील करंजवाडी (अडसरे बु.) येथे एका नराधम शिक्षकाने गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना घडवली आहे. जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या एका 9 वर्षांच्या चिमुरडीवर या नराधमाने मागील सात ते आठ महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण जिल्हा हादरला असून पालकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी तिसरीत शिकत असून शिक्षक रामचंद्र मनाजी कचरे (55) याने तिला जिवे मारण्याची धमकी देऊन दीर्घकाळ तिचे शोषण केले. आजीला थोडाफार संशय आला होता. त्यानंतर पीडितेने धाडस करून 16 जानेवारी रोजी हा सर्व प्रकार आपल्या आजीला सांगितला. त्यानंतर कुटुंबियांनी तातडीने घोटी पोलीस स्टेशन गाठून या नराधम शिक्षकाविरोधात सविस्तर तक्रार दाखल केली.
advertisement
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने ॲक्शन घेत आरोपी शिक्षक रामचंद्र कचरे याला बेड्या ठोकल्या आहेत. मंगळवारी त्याला कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने त्याला 24 जानेवारीपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी टाकेद येथील एका शाळेतही असाच प्रकार घडला होता, त्यामुळे या नराधम शिक्षकाने इतरही मुलींसोबत असे कृत्य केले आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.
advertisement
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी फॉरेन्सिक लॅबच्या टीमला पाचारण करण्यात आले असून घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांनी या प्रकरणासाठी एक विशेष पथक नियुक्त केले आहे. यामध्ये निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असून ते साक्षीदारांचे जबाब आणि मेडिकल रिपोर्टवर काम करत आहेत.
advertisement
दरम्यान, जिल्हा परिषद शाळेतील सुरक्षिततेवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गुन्ह्यात पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार कडक कलमे लावण्यात आली आहेत. पोलीस प्रशासन या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी यासाठी दोषारोपपत्र तयार करण्यात गुंतले असून, समाजातून या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
Jan 21, 2026 8:58 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
Nashik Crime : नाशकात 9 वर्षाच्या विद्यार्थिनीवर शिक्षकाचा वारंवार अत्याचार, तब्बल 8 महिने दिल्या नरक यातना, आजीला संशय आला अन्...








