धानोरकर यांच्या या वक्तव्यावर उत्तर देताना प्रतिस्पर्धी इच्छुकाच्या यादीमध्ये माझे स्वत:चे आमदार होते, असा खुलासा करताच सभेत एकच हश्या पिकला.
'आधी आम्ही सत्तेत होतो, सरकार गेल्यानंतर अजितदादा विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर जेव्हा विरोधी पक्षनेते व्हायची वेळ आली तेव्हा आम्ही आमदार संभ्रमात होतो, आम्ही 25 ते 28 आमदारांनी संग्राम थोपटेंचं 25 ते 28 आमदारांच्या सह्यांचं पत्र दिल्लीला पाठवलं, पण विजयभाऊदेखील फिल्डिंग लावून होते, हे आम्हाला माहितीच नव्हतं. कधी सभागृहात आक्रमक न होणारे आमचे बाळासाहेब थोरातही यावेळी सभागृहात आक्रमक झाले. यशोमतीताई सुद्धा आक्रमक होत्या, पण विजय वडेट्टीवारांनी पद कसं आणलं हे समजलं नाही,' असं वक्तव्य प्रतिभा धानोरकर यांनी केलं.
advertisement
वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
'तुम्ही 28 सह्या घेतल्या त्यातल्या 15 च्या सह्या मी घेऊन टाकल्या. प्रतिस्पर्धी इच्छुकाच्या यादीमध्ये माझे स्वत:चेही आमदार होते,' असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं.
पावसाळी अधिवेशनाच्या सुरूवातीला काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाच्या नावाची घोषणा होत नव्हती, अखेर अधिवेशनाच्या शेवटी वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात मागच्या वर्षी शिवसेना आणि भाजपचं सरकार आल्यानंतर अजित पवार विरोधी पक्षनेते झाले, पण जुलै महिन्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीतल्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आधी शिवसेना आणि मग राष्ट्रवादीतल्या फुटीमुळे काँग्रेस हा सर्वाधिक विरोधी आमदार असलेला पक्ष झाला, त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाची संधी काँग्रेसला मिळाली.