मुंबई : देशात अजूनही मोठ्या प्रमाणावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबे वास्तव्यास आहेत. अनेकांसाठी दोन वेळचे पोटभर जेवण मिळवणेही आव्हानात्मक ठरते. अशा गरजू नागरिकांना अन्नसुरक्षा मिळावी, यासाठी केंद्र सरकार राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) अंतर्गत मोफत किंवा अनुदानित धान्याचे वितरण करते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध रेशन कार्ड असणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात रेशन कार्डधारकांची मोठ्या प्रमाणावर छाननी सुरू असून, अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळली जात असल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
advertisement
सरकारी तपासणीत असे आढळून आले की अनेक ठिकाणी मृत व्यक्तींच्या नावावर वर्षानुवर्षे रेशन वितरित होत होते. काही प्रकरणांत कुटुंबातील सदस्य स्थलांतरित झाले असतानाही कार्ड सुरू ठेवण्यात आले होते, तर काहींनी उत्पन्न मर्यादा ओलांडूनही रेशन कार्डाचा लाभ घेतला होता. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी पडताळणी प्रक्रिया अधिक कठोर केली आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत देशभरातून तब्बल 2.25 कोटी रेशन कार्डधारकांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कारवाईचा उद्देश गरजू लोकांचे हक्क हिरावून घेणे नसून, सरकारी अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खरोखरच गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात रेशन कार्डधारकांच्या नोंदींची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येत आहे. उत्पन्नाची मर्यादा, कुटुंबातील सदस्यांची संख्या, वास्तव्यातील बदल, मृत्यूची नोंद तसेच ई-केवायसीची स्थिती या सर्व बाबींचा तपशीलवार आढावा घेतला जात आहे.
पडताळणीदरम्यान असेही समोर आले आहे की अनेक लाभार्थ्यांनी केवळ इतर सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी रेशन कार्ड काढले होते. काही कुटुंबांनी सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ रेशन घेतलेले नव्हते. अशा परिस्थितीत ही कार्डे निष्क्रिय मानली जात असून, संबंधित कुटुंबांची नावे सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) यादीतून हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
नाव कुठे चेक कराल?
दरम्यान, अनेक नागरिकांना आपले नाव यादीतून काढून टाकले गेले आहे की नाही, याबाबत संभ्रम आहे. मात्र, याची पडताळणी करणे सोपे आहे. नागरिकांनी nfsa.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. त्यानंतर ‘रेशन कार्ड’ या पर्यायावर क्लिक करून राज्याच्या पोर्टलवरील रेशन कार्ड तपशील निवडावा. पुढे राज्य, जिल्हा, तालुका किंवा ब्लॉक, पंचायत तसेच रेशन दुकान आणि कार्ड प्रकार निवडल्यावर लाभार्थ्यांची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसते. या यादीत नाव असल्यास कार्ड सक्रिय आहे, तर नाव नसल्यास ते यादीतून वगळण्यात आले असल्याचे समजावे.
याशिवाय, सरकारने ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली आहे. ज्या रेशन कार्डचे ई-केवायसी अद्याप पूर्ण झालेले नाही, ती कार्डे प्रथम तात्पुरती निष्क्रिय केली जातील आणि नंतर कायमस्वरूपी रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी वेळेत ई-केवायसी पूर्ण करून आपले रेशन कार्ड सक्रिय ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
